आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrong Question Paper Given To B.ED Student In Amravati

बी.एड.च्या परीक्षेत पेपर एक अन् प्रश्न भलतेच; विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील केंद्रांवर विद्यार्थी संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुणवाढ प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. बी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षेत नियोजित पेपरऐवजी दोन दिवसांनंतर होणाऱ्या विषयाचे प्रश्न विचारण्यात आल्याने शहरासह जिल्ह्यातील बहुतांश परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.

विद्यापीठाची ही चूक लक्षात येताच विद्यार्थ्यांनी पेपर सोडवण्यास स्पष्ट नकार दिल्याने काही काळ परीक्षा केंद्रांवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या रेट्यामुळे शेवटी परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर सोमवारी (दि. २०) ओढावली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सोमवारी सुरू झाल्या असून, अमरावती जिल्ह्यासह विभागातील पाचही जिल्ह्यांत बी.एड. अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जात आहे. बी.एड. अभ्यासक्रमाचा ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाचा पेपर सोमवारी सकाळी नऊ वाजता नियोजित होता.

नियोजित वेळेवर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी पोहोचलेदेखील, मात्र हाती भलतीच प्रश्नपत्रिका पडल्याने विद्यार्थी चक्रावून गेले. नियोजित विषयाची प्रश्नपत्रिका देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली, मात्र बराच वेळ झाल्यानंतरदेखील नवीन प्रश्नपत्रिका मिळाल्याने विद्यार्थी संतापले.
मानसिकतेवर परिणाम

विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचे नियोजन आता विस्कळीत झाले आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. अशा चुका योग्य नाहीत. अाता पुन्हा तयारी करावी लागेल. अक्षयसोनार, परीक्षार्थी, परतवाडा

भविष्यासाठी घातक

अभ्यास झाला होता. वेळापत्रकानुसार होणाऱ्या पेपरचे नियोजनही केले होते. परंतु, पहिल्याच दिवशी असा गोंधळ उडाला. याचा मनस्ताप झाला आहे. अशा पद्धतीचा अवलंब विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकतो. पल्लवीकांगटे, परीक्षार्थी, परतवाडा

वेळापत्रकात बदल

विद्यापीठाच्या वतीने शिक्षणशास्त्र विषयाचा नियोजित पेपर होणार होता. परंतु, सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या वेगळ्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमुळे परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येईल. तशा सूचनाही दिल्या जातील. शिवाय या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात येईल. डी.बी. वानखडे, सहायक कुलसचिव, संगाबा विद्यापीठ, अमरावती

विषयाची प्रश्नपत्रिका बदलल्याने गोंधळ

सोमवार शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा पहिला दिवस होता. विद्यापीठाकडून आलेल्या विषय क्रमांकानुसार प्रश्नपत्रिका वितरित करण्यात आल्या होत्या. परंतु, सीलबंद प्रश्नपत्रिकांच्या लिफाफ्यात वेगळ्याच विषयाच्या प्रश्नपत्रिका आल्या. प्रा.एस. एस. भागवत, परीक्षाप्रमुख, बी.एस. पाटील महाविद्यालय, परतवाडा.

पुढे काय ?

बी.एड.अभ्यासक्रमाचा सोमवारी रद्द झालेला पेपर इतर दिवशी घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून केले जात आहे. अधिष्ठात्यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. मात्र, पेपर नेमका कोणत्या दिवशी घेतला जाईल, याबाबत आगामी काळात विद्यापीठाकडून घोषणा केली जाईल.

मॉडरेशन समितीकडून चूक

विद्यापीठाचे पेपर तयार करण्याची जबाबदारी मॉडरेशन समितीवर आहे. समितीतील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून पेपर तयार केले जातात. बी.एड. अभ्यासक्रमाच्या पेपरबाबत मोठा गोंधळ झाल्याने याबाबत प्र-कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके अध्यक्षतेखाली अधिष्ठात्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या प्रकरणात मॉडरेशन समिती दोषी असल्याचे प्राथमिक निष्कर्षात आढळून आले आहे.

पेपर दिल्याची खंत

उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाचा आज पेपर होणार होता. मात्र, प्रश्न दुसरेच देण्यात आले होते. २३ एप्रिल रोजी असलेल्या शैक्षणिक मानसशास्त्र विषयाचे प्रश्न असल्याने ती तर प्रश्नपत्रिका देण्यात आली नाही ना, अशी शंका उपस्थित झाली. नियोजित विषयाचा पेपर देता आल्यामुळे अनेकांची निराशा झाली. तयारी करून आल्यानंतरदेखील पेपर देता आला नाही. मयूर चौधरी, विद्यार्थी

विद्यार्थ्यांचे खच्चीकरण

परीक्षा सुरू होताच काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर निरीक्षकांकडून प्रश्नपत्रिका परत घेण्यात आल्या. विद्यापीठाकडून हाच पेपर देण्याबाबत बोलणीदेखील करण्यात आल्याची माहिती आहे. तयारी करून आल्यानंतरदेखील असे प्रकार होत असल्याने मानसिक खच्चीकरण होते. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. सोनाली मंगळे, विद्यार्थिनी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आधीच या ना त्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात असताना विद्यापीठाचा परत एक भोंगळ कारभार सोमवारी चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वतीने सोमवारी सकाळी नऊ ते १२ या वेळेत बी.एड. (शिक्षणशास्त्र) या शाखेचा पेपर होणार असल्याने येथील बी. एस. पाटील महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर सोमवारी शंभर परीक्षार्थी आले होते.
सकाळी नऊ वाजता परीक्षार्थी केंद्रात पेपर देण्याकरिता दाखल झाले. नियोजित "उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक' या विषयाचा पहिला पेपर होणार होता. परंतु, विद्यार्थ्यांना या विषयाची प्रश्नपत्रिका देण्याऐवजी शैक्षणिक मानसशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने परीक्षा केंद्रावर आलेले परीक्षार्थी चक्रावून गेले आणि एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी ही बाब परीक्षा केंद्रप्रमुखांच्या निर्दशनास आणून देत संताप व्यक्त केला. दरम्यान, परीक्षा केंद्रप्रमुखांनी विद्यापीठाशी संपर्क साधून माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका जमा करून परीक्षा रद्द केली.