आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातमुक्तीसाठी तरुणाईचा जागर, आरटीओंच्या ऑनलाइन अपॉइंटमेंटसंबंधी जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासोबतच वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांची इत्थंभूत माहिती व्हावी, यासाठी शहरातील संघटना तरुणाई पुढे आली आहे.
नियम वाहन परवान्यासाठी आरटीओच्या ऑनलाइन अपॉइंटमेंटसंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मैत्री विद्यार्थी संघ ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. १८) शहरातील चौकांमध्ये उभे राहून पत्रकं वाटून अपघातमुक्त अमरावतीसाठी प्रत्येकाला वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी दै. ‘दिव्य मराठी’ने हाती घेतलेल्या अभियानाला सर्वच स्तरांतून व्यापक प्रतिसाद मिळत असून, तरुणाईने सुरू केलेला हा जागर या अभियानाचीच फलश्रुती आहे.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल; तसेच लायसन्स (वाहन परवाना) काढण्यासाठी नव्याने अमलात आलेली ऑनलाइन अपॉइंटमेंट कशी घ्यावी, याची माहिती तरुणांनी शेकडो वाहनचालकांना दिली. या ऑनलाइन अपॉइंटमेंटमुळे लायसन्स काढू इच्छिणाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचे त्यांनी पटवून दिले.
मागील काही दिवसांपासून आरटीओ कार्यालयामध्ये लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रणाली कार्यान्वित झाली आहे. मात्र, अनेकांना ऑनलाइन लायसन्स काढण्याची प्रक्रिया माहिती नाही. लायसन्स काढण्यापूर्वी द्यावी लागणाऱ्या परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या वाहतूक नियमांची माहिती देणारे माहितीपत्रक आरटीओ कार्यालयाने तयार केले आहे. शहरातील मैत्री विद्यार्थी संघाच्या तरुणांनी हेच पत्रक वाहनचालकांना वाटले आहे. या वेळी भाजयुमोचे शहर जिल्हा अध्यक्ष अजय सारस्कर, मैत्री विद्यार्थी संघाचे अविनाश भाकरे, निखिल गाले, शुभम चौधरी, अक्षय वानखडे, यशवंत निचत, नीलेश सव्वालाखे, सचिन कारले, जाकीर जमाल, आदर्श भुयार, दर्शन जाधव यांच्यासह अन्य तरुणांचा सहभाग होता.

वाहनचालकांचाही मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

‘मैत्री’चेतरुण आरटीओद्वारे प्रकाशित माहितीपत्रक वाहनचालकांना देत होते. त्या वेळी वाहतूक नियम ऑनलाइन अपॉइंटमेंटची अधिक माहिती घेण्यासाठी नागरिक स्वत:हून त्यांना विचारणा करत होते. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठांचाही समावेश होता. या उपक्रमाला सर्वच वाहनचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राजकमल चौकात दिसून आले.

पुढे काय ?

अपघात मुक्तीसाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेले प्रयत्न जनजागृती यापुढील काळात अधिक व्यापक स्वरूपात केले जाणार आहे. यासाठी सामाजिक संघटना पुढे येत आहेत. संघटनांना या कामी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी तसेच मोटार वाहन कर्मचारी संघटना, आरटीओंच्या इतर संघटनांचेसुद्धा सहकार्य मिळत आहे.

अपघात मुक्त अमरावती शहराचा केला संकल्प

मागील दोन महिन्यांपासून शाळा, कॉलेजमध्ये जाऊन वाहतूक नियमांची माहिती देत आहोत. रस्त्यांवर उभे राहून जनजागृती करीत आहोत. यापुढेही आमचे हे अभियान निरंतर सुरूच राहणार आहे. अमरावती शहर हे अपघातमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. अविनाशभाकरे, अध्यक्ष, मैत्री विद्यार्थी संघ.

अपघात टाळण्यासाठी जनजागृती महत्त्वाची

अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात रोखले जाऊ शकतात. त्यासाठीच जनजागृती करून चालकांना वाहतूक नियमांची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाहनचालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून सहकार्य करावे. अजयसारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजयुमो.

फोटो - राजकमल चौकात वाहनचालकांना वाहतूक नियमांचे स्मरण करून देताना युवक.