आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Thousand Crores Package For Drought Proven ?, Finance Minister Depart To Delhi

दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज १० हजार कोटी रुपयांचे?, अर्थमंत्री दिल्लीकडे रवाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांवर विधिमंडळात चर्चा सुरू झाली असताना राज्य सरकारने पॅकेजच्या तयारी सुरू केली आहे. तातडीची मदत तसेच अल्प व दीर्घकालीन उपाययोजना असे एकत्रित ९ ते १० हजार कोटींचे पॅकेज आकारास आणण्याचे प्रयत्न असल्याची माहिती अर्थ व नियोजन विभागातील सूत्रांनी दिली.

हिवाळी अधिवेशनात बुधवारी दुष्काळ व शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा गुरुवारी आटोपून त्यावर सरकारतर्फे उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या उत्तरात या संभाव्य पॅकेजमधील काही निवडक बाबींचा उल्लेख करता येईल का याची चाचपणी सुरू असून ते प्रामुख्याने केंद्राकडून जाहीर होणा-या मदतीवर अवलंबून राहणार आहे. राज्य सरकारने यापूर्वीच केंद्र सरकारकडे ३ हजार ९२४ कोटींच्या मदतीची मागणी केली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिल्लीला रवाना झाले असून ते गुरूवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करतील. या चर्चेतूनच केंद्राच्या मदतीचे स्वरुप स्पष्ट होईल. तथापि, राज्याने ९ ते १० हजार कोटींच्या पॅकेजची तयारी सुरु केली असल्याची विरोधी पक्षात असताना युतीचे नेते मदतीवरून सातत्याने आघाडी सरकारवर टीका करायचे. त्यामुळे आघाडीच्या तुलनेत अधिक मदतीचे पॅकेज जाहीर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.या पॅकेजमध्ये अनेक योजनांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींचा एकत्रित समावेशाची शक्यता आहे.

आज अंशत: घोषणा
दुष्काळावरील चर्चेत सरकारकडून गुरुवारी दिल्या जाणा-या उत्तरात संभाव्य पॅकेजमधील काही घटक जाहीर होतील. आघाडी सरकारच्या परंपरेनुसार अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे.

पॅकेजमध्ये काय?
- शेतक-यांना मदत
- दुष्काळी गावांत तातडीच्या, दीर्घकालीन उपाययोजना
- ५००० गावांत जलयुक्त शिवार योजना
- सॉइल हेल्थकार्ड, ठिबक सिंचन वाढ योजना
- सिंचन प्रकल्प

विरोधक आक्रमक, सत्ताधा-यांचे तुणतुणे
भरीव मदत द्या
राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने शेतक-यांना भरीव मदत देता येईल. राज्य सरकारने ८ ते १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, असे रडगाणे सरकार गात राहिले तर शेतक-यांची हिंमत खचेल. राज्याची पतही जाईल.
- अजित पवार, राष्ट्रवादीचे गटनेते
हे तर तुमचेच पाप!
आता आरडाओरडा करण्यापेक्षा गेल्या १५ वर्षांत सिंचनाचे काम केले असते तर ही वेळ आली नसती. तुम्हीच आपल्या पापाचे धडे वाचत आहात. दुष्काळावर तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही. पंधरा वर्षात सिंचनाचा प्रश्न न सोडवल्यामुळेच आज ही परिस्थिती ओढवली आहे.
- दिवाकर रावते, परिवहन मंत्री.
सांगा, शेतक-यांनी जगायचे कसे?
यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षा भयानक आहे. मुख्यमंत्री पाणीटंचाई नसल्याचे सांगत असले तरीही तशी परिस्थिती नाही. धरणाची पातळी खाली गेली असून मराठवाड्यात डिसेंबरमध्येच २ हजार पाण्याचे टँकरची व्यवस्था करावी लागली. सध्या १५ दिवस पुरेल इतकाच चारा आहे. शेती नाही, प्यायला पाणी नाही, गुरे विकायची वेळ आली आहे. बळीराजासमोर जगायचे कसे, असा प्रश्न आहे. त्यामुळे आत्महत्या वाढत आहेत.
- धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस