आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाळ्यातही राज्यात पाण्याचे 1014 टँकर सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - विदर्भासह राज्यातील काही भागात यंदा वरुणराजाच्या ‘कृपे’ने अतिवृष्टी झाली असली तरी गतवर्षीचे दुष्काळाचे सावट मात्र अजूनही काही भागातून हटलेले नाही. निम्मा पावसाळा उलटला तरीही राज्यात अजूनही 1014 टँकरच्या आधारे 4 हजार 196 वाड्या आणि 774 गावांतील रहिवाशांची तहान भागवली जात आहे.

पुणे विभागातील पाच जिल्ह्यात 832 टँकर धावत आहेत. आठवडी अहवालाचा एक भाग म्हणून राज्य शासनाचे कक्ष अधिकारी या. मो. पटेल यांनी 19 ऑगस्ट रोजी हा अहवाल मुख्यमंत्री आणि पाणीपुरवठा विभागाच्या राज्यमंत्र्यांसह इतर 15 यंत्रणांना पाठवला आहे.


राज्यात सर्वाधिक टँकर पुणे विभागात धावत असून मराठवाड्यात 108, नाशिक विभागात 66, तर पश्चिम विदर्भात केवळ आठ टँकरने पिण्याचे पाणी द्यावे लागते. पुणे विभागातील एकट्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 288 टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यात 262, सांगलीत 203, तर पुण्यात 66 टँकरने पाणी पुरवले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र हे अजिबात पाणीसंकट नसून तेथे अद्याप टँकरची गरज भासली नाही. पुणे विभागातील 606 गावे व 3950 वाड्यांवर पाणी पोहोचवल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती असल्याचे अहवालात नमूद आहे.


खासगी टँकरची ‘दुकानदारी’
पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या टँकरमध्ये खासगी यंत्रणेच्या टँकरचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे त्या गावांमध्ये खरेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे की नाही, अशी शंका आहे. सद्य:स्थितीत पुणे विभागातील 832 टँकरमध्ये खासगी टँकरचा आकडा 769 आहे. विशेष असे, की दरवर्षी हे संकट कायम असते आणि मोठय़ा प्रमाणात खासगी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असतो.


कोकण, नागपुरात मुबलक पाणी
कोकण व नागपूर विभागात पिण्याचे पाणी मुबलक आहे. त्यामुळे या विभागातील एकाही गावात टँकर पुरविले जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत काही गावांतील स्रोत संपुष्टात येत असल्याने त्या वेळी मात्र वेगळी स्थिती असते, असे महसूल यंत्रणेचे म्हणणे आहे.


पश्चिम विदर्भात केवळ आठ टँकर
पश्चिम विदर्भात केवळ आठ टँकर धावत आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या भागात टंचाई जाणवत नाही, परंतु बुलडाणा जिल्ह्यातील तीन गावे अशी आहेत, जेथे भूपृष्ठावरील व भूपृष्ठाखालील स्रोत नाही. त्यामुळे तेथे आठ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.


पाणी येणार कुठून ?
पुणे विभागात जलस्रोत नाहीत म्हणून दरवर्षी टँकर पुरवावे लागते. भूपृष्ठावर पाणी नसल्याने विहीर वा बोअरवेल खोदून काही गावांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा, हा पर्याय आहे. परंतु, पाऊसच नाही, तर जमिनीत तरी पाणी कोठून येईल? त्यामुळे टँकर व इतर साधनांचाच आधार घ्यावा लागतो. शिवकालीन पाणी साठवण योजना, रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व इतर उपायही केले जात आहेत. - रणजित कांबळे, राज्यमंत्री, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय.