आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 24 Crores Fraud Diclose, Chief Minister Fadanvis Confessed

24 कोटींचा अपहार उघड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली, कठोर कारवाईचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना संगणक व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणासाठी मंजूर निधीपैकी २४ कोटी रुपयांचा अपहार तीन खासगी कंपन्यांचे अधिकारी आणि सरकारी कर्मचा-यांनी केल्याचे सिद्ध होऊनही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात दिली. त्यावरून राज्याचे गृहखाते किती तत्पर आहे हे स्पष्ट झाले.

वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या संगणक आणि इतर विषयांच्या प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण देणा-या कंपन्यांचे अधिकारी व शासनाचे संबंधित अधिकारी, कर्मचा-यांनी आपसात संगनमत करून बेकायदेशीरपणे शासनाच्या २४ कोटी २८ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार करीत शासनाचे आर्थिक नुकसान केले. १३ मे २०१४ रोजी लोकप्रतिनिधींनी लाचलुचपत खात्याला पत्र पाठवून अपहाराबाबत तक्रार केली होती. प्रतिबंधक विभागाने चौकशी केल्यानंतर वरील बाब उघडकीस आली. बिर्ला श्लोका एज्युकेशन लि. चे रिजनल हेड, झेनिथ सॉफ्टवेअर लि.चे उपाध्यक्ष आणि कोअर एज्युकेशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष यांच्यासह शासनाच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी हा अपहार केल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींनी मे महिन्यात पत्र दिल्यानंतर चौकशी करून तक्रार दाखल करायला तब्बल सहा महिने लागले. एवढे करूनही या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन आरोपींना सहकार्य करणारे समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागाबाबत कार्यालयीन कर्तव्यानुसार जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येत असल्याचेही म्हटले आहे, परंतु काय कारवाई होणार हे मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले नाही. संजय सावकारे, सुचित मिणचेकर, राजेश क्षीरसागर आणि उन्मेश पाटील यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

तर गुजरातचे टँकर परत जाणार नाहीत : कदम
गुजरातमधील नद्यांमध्ये विषारी केमिकल न टाकता आपल्या राज्यातील नद्यांमध्ये टाकण्यासाठी गुजरातमधून टँकर येतात. राज्यातील नद्यांमध्ये प्रदूषण करणारे असे टँकर येत असतील तर ते परत जाणार नाहीत, असा इशारा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिला. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये रामदास कदम यांनी सांगितले, दुष्काळी भागाचा पाण्याची समस्या सोडविण्यासाठी इतर भागातील नद्यांचे पाणी वळविण्याची योजना चांगली असली तरी कोकणातील नद्यांचे पाणी वळताना ते जास्त असले तरच वळविण्यात यावे.
७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेल्या कोकणातील अनेक स्थळे पर्यटन योग्य आहेत त्यांचा विकास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जैतापूर प्रकल्पाबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, या प्रकल्पामुळे कोकणचा कोळसा होण्याची शक्यता असून शिवसेना ते होऊ देणार नाही. आघाडी सरकारने सिंचन योजना अर्धवट सोडल्यानेच पाण्याची समस्या निर्माण झाली. तसेच सहा हजार कोटींच्या कामांच्या ठिकाणी ठेकेदारांना २६ हजार कोटींची कामे आघाडी सरकारने दिल्याचा आरोप करीत रामदास कदम म्हणाले, ज्यादा दिलेले २० हजार कोटी रुपये ठेकेदारांकडून परत मिळवायला पाहिजेत. हा पैसा विकासासाठी खर्च करता आला असता.

विदर्भाच्या मागणीबाबत रामदास कदम म्हणाले की, शिवसेना अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेवर कायम असून राज्याचे तुकडे आम्ही पडू देणार नाही.