आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेळघाटात वाघोबांची संख्या आता 38 वर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - देशातील पहिल्या नऊ अभयारण्यांमध्ये गणना होत असलेल्या मेळघाट अभयारण्यात वाघांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 38 वर पोहोचले आहे. गेल्या वर्षी मेळघाटात 29 वाघ आणि 3 बछडे होते. यंदा ही संख्या 32 वाघ आणि 6 बछड्यांवर पोहोचली. मे 2013 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेतून हे सुखद वास्तव पुढे आल्याचे मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकार्‍यांनी सांगितले.

मेळघाटात यावर्षी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्याघ्र गणना करण्यात आली. आतापर्यंत वाघांची संख्या पावलांच्या ठशांवरून ठरविली जात होती. परंतु, ही पद्धत तितकीशी प्रभावी नव्हती. मे 2013 मध्ये झालेली व्याघ्र गणना छायाचित्रांच्या आधारे करण्यात आली आहे. त्यासाठी संपूर्ण जंगलात तब्बल 300 कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी दोन कॅमेरे लावले गेले होते. एकाच ठिकाणी दोन कॅमेरे असल्यामुळे एका वाघाची एकाच वेळी दोन्ही बाजूने छायाचित्रे घेतली जात होती.


प्रत्येक वाघाला स्वतंत्रपणे ओळखण्यासाठी त्या प्रत्येकाची एकापेक्षा अधिक छायाचित्रे घेण्यात आली होती. मे महिन्यात झालेल्या व्याघ्र गणनेमध्ये जंगलात दीड महिन्यांपासून कॅमेरे लावण्यात आले होते. व्याघ्र गणनेसाठी वापरण्यात आलेले कॅमेरे महागडे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून अंधारातसद्धा ते पभावी आणि सुस्पष्ट छायाचित्र काढतात. मेळघाट अभयारण्य तब्बल 2 हजार 29 वर्ग किलोमीटर परिसरात विस्तारलेले आहे. त्यामुळे एकाच वेळी संपूर्ण जंगलात कॅमेरे लावणे शक्य नव्हते. अशावेळी जंगलाचे दोन भागांत वर्गीकरण करून दोन टप्प्यांत ही मोहीम राबविण्यात आली होती. व्याघ्र गणना करताना तब्बल 398 छायाचित्रे घेण्यात आली होती. त्यानंतर तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती वाघांची अंतिम संख्या मोजण्यात आली. यावरून सध्या मेळघाटात 32 वाघ आणि 6 बछडे असल्याचे स्पष्ट झाले. वाघांची वाढलेली संख्या वन्यप्रेमींबरोबरच सर्वसामान्यांनाही समाधान देणारी आहे.