आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेला भगदाड : नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून पाच कुख्यात कैदी पळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - प्रचंड सुरक्षा असलेल्या नागपूर मध्यवर्ती तुरुंगाचे प्रशासन गाढ निद्रेत असताना सोमवारी रात्री २ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान न्यायालयीन कोठडीतील पाच कुख्यात गुंड अत्यंत शिताफीने पसार झाले.
एखाद्या चित्रपटातील कथेला शोभावे त्याप्रमाणे या गुंडांनी पांघरुणाचा दोरखंड बनवला आणि त्याच्या साह्याने एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून तुरुंगाची पंचवीस फूट उंच भिंत पार केली. नागपूर तुरुंगाच्या इतिहासात चोवीस वर्षांनंतरची ही दुसरी घटना आहे.
पलायन केलेल्या कैद्यांमध्ये बिसनसिंग रामुलाल उके (वय २५, रा. शिवनी, मध्य प्रदेश), मोहम्मद शोएब ऊर्फ सिब्बू सलीम खाल (२४), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (२४) या मोक्का लावलेल्या कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत प्रेम ऊर्फ नेपाळी शालिकराम खत्री (२१) आणि आकाश ऊर्फ गोलू गज्जूसिंग ठाकूर (२३) (सर्व रा. नागपूर) हे दरोडेखोरही फरार झाले. या घटनेनंतर कारागृह अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागाचे महानिरीक्षक शशिकांत शिंदे यांना प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले.
राज्यातील तुरुंगांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कैद्यांना पकडण्यासाठी नागपूर पोलिस आयुक्तांनी आठ पथके तयार करून नाकाबंदी सुरु केली आहे.बिसनसिंग, शोएब आणि सत्येंद्र हे राजा गौस टोळीतील कुख्यात गुंड आहेत. एक वर्षांपूर्वी राजा गौस आणि बिसनसिंग, शोएब आणि सत्येंद्र यांनी उंटखाना परिसरात रोशन समरित या युवकाचा खून केला. या खुनाच्या प्रकरणात पोलिस त्यांच्या मागावर असताना जगनाडे चौकात त्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला होता. यात एक पोलिस शिपाई जखमी झाला होता.
पोलिसांनी कालांतराने सर्व आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध नागपुरातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्याविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. इतर दोन कैद्यांना शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा आणि चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकरणांत अटक करण्यात आली होती. फरार झालेल्या सर्व कैद्यांविरुद्ध सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कारागृहाच्या दक्षिणेकडील सहा क्रमांकाच्या बॅरकमध्ये १५४ कैदी होते. सकाळी १० च्या सुमारास तुरुंगाधिकारी वैभव आत्राम हे कैद्यांची हजेरी घेत असताना पाच कैदी कमी आढळले.
नागपुरात कायदा- सुव्यवस्था स्थिती गंभीर

मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून पोलिस यंत्रणा कुचकामी ठरत आहे. तुरुंगातून गुंड पळण्याची चर्चा असताना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास ग्रामीण पोलिस मुख्यालयाजवळ पाटणकर चौकात गोळीबार झाला.
सोमवारी एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा खून करण्यात आला. काही दिवसांपूर्वी एका मोबाईल व्यापाऱ्याचा त्याच्या दुकानात दिवसाढवळ्या दहा ते वीस लोकांसमोर खून करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळच एका कोळसा माफियावर गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला. या घटनांमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचे अंकुश नाही, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे.
सीसीटीव्ही, जॅमर कागदावरच, मोबाईलचा सुळसुळाट
१२ व्या पंचवार्षिक योजनेत देशातील महत्वाच्या तुरुंगात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात नागपूरचाही समावेश आहे. परंतु नागपूर तुरुंगाचे प्रवेशद्वार वगळता इतर कुठेही सीसीटीव्ही बसवलेले नाहीत. शिवाय तुरुंगात बसवलेले मोबाईल जॅमर पुरेसे नाहीत. सीटीव्हीला आणि अधिकच्या जॅमरला मंजुरी मिळाली असतानाही ते कागदावरच आहेत. तुरुंगात मोबाईलचा सुळसुळाट असून दोन दिवसांपूर्वी सात मोबाईलही सापडले होते.
नामचीन कैदी अतिसुरक्षेत

^ सर्व कैद्यांची हजेरी घेण्यात आली. याकुब मेमन, नुकताच आलेला हिमायत बेग आणि अरुण गवळीसारखे संवेदनशील कैदी अतिसुरक्षित बराकीत आहेत. या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- शशिकांत शिंदे तुरूंग महानिरीक्षक
मुख्यमंत्र्यांचे नागपूर शहर क्राइम कॅपिटल
^ नागपूर तुरूंगातून मोकाचे पाच आरोपी पलायन करतात, तडीपार गुंड एका युवतीला मारहाण करतात यावरूनच राज्यातीलच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या शहरातीलही कायदा व सुरक्षा व्यवस्था चांगली नसल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांचे नागपूर क्राइम कॅपिटल बनले आहे.
धनंजय मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते
तैनात शिपाई तेव्हा काय करीत होते?

कैदी पळून गेलेल्या मार्गात एक ‘वॉच टॉवर’ आहे. कैद्यांवर पहारा ठेवण्यासाठी या टॉवरवर चार शिपाई असतात. रात्री कैदी पळत असताना वॉच टॉवरमधील शिपाई काय करीत होते, असा सवाल उपस्थित होत आहे. कारागृहातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने वॉच टॉवरवरील शिपाई दारू पिऊन गाढ झोपले हाेते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तुरुंगात १० अतिरेकी अाणि ५० माओवादी

नागपूर मध्यवर्ती तुरुंग अतिशय संवेदनशील आहे. येथे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील फाशी झालेला याकूब मेमन, जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील हिमायत बेग, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी असे दहा दहशतवादी शिक्षा भोगत आहेत. त्याशिवाय जवळपास पन्नास माओवादी आणि एक विदेशी गुन्हेगार आहे. त्यापैकी २४ जणांना फाशीची शिक्षा झालेली आहे.

असे पळाले कैदी
नागपूर तुरुंग प्रशासनाने या धाडसी पलायनाचा प्राथमिक तपास केला. त्यानुसार घटनाक्रम असा :
१. फरार झालेल्या पाच कैद्यांनी बराकीच्या पूर्वेकडील एका खिडकीची एक जाड सळई कापली आणि ती वाकवून पांघरुणासाठी असलेली चादर घेऊन बाहेर पडले.
२. ‘बडी गोल’ ची १० फुटांची सुरक्षा भिंत ओलांडली. परंतु त्यांच्या पळण्यात सर्वांत मोठा अडसर होती ती २५ फूट उंच सुरक्षा भिंत. ती ओलांडण्यासाठी कैद्यांनी पांघरुणाच्या चादरी एकमेकांना बांधल्या आणि
दोरखंड तयार केला.
३. चादरीच्या दोरखंडाच्या मदतीने भिंत ओलांडण्यासाठी भिंतीपलीकडे एक व्यक्ती असणे आवश्यक होते. त्याकरिता सर्वजण एकमेकांच्या खांद्यांवर चढले आणि पहिला कैदी भिंतीवर चढला. त्याने भिंतीवरून कारागृहाबाहेर उडी मारली.
४. त्यानंतर बाहेरच्या कैद्याने चादरीचा दोरखंड एका झाडाला बांधला, इतर चौघेही एकापाठोपाठ भिंतीवर चढले आणि तुरुंगाबाहेर पडून धूम ठाेकली.
१९९० ची पुनरावृत्ती
२ सप्टेंबर १९९० रोजी सुरक्षा रक्षकाला बेशुद्ध पडेपर्यंत गांजा पाजून जन्मठेपेचे सहा कैदी पळाले होतेे. त्यापैकी पाच कैदी पकडले. एक अद्यापही फरार आहे.