आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 People Death At Travels Fire Issue At Amravati Nagpur Highway, Divya Marathi

ट्रॅव्हल्सला लागलेल्‍या भीषण आगीत नऊ महिन्याच्या बाळासह 5 जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - धुळ्याहून नागपूरला जाणार्‍या एका खासगी बसने अचानक पेट घेतल्याने साखर झोपेतच चार प्रवाशांचा कोसळा झाला, तर जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारणार्‍या एका प्रवाशाचा रस्ता दुभाजकावर आदळून मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे अमरावती - नागपूर मार्गावरील तळेगाव (श्या.पंत) लगतच्या सत्याग्रही घाटात घडलेल्या दुर्घटनेत आठ प्रवासी जखमी झाले.

धुळे येथून बाबा ट्रॅव्हल्सची वातानुकूलित बस (एमएच 31 सीक्यू 2779) 30 प्रवासी घेऊन नागपूरकडे जात होती. पहाटे सव्वापाचच्या सुमारास तळेगावजवळच्या सत्याग्रही घाटात बसला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच चालकाने गाडी थांबवली. प्रवाशांनी मिळेल त्या मार्गाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. या वेळी बाहेर निघू न शकलेल्या चार प्रवाशांचा जागीच कोळसा झाला, तर खिडकीतून उडी मारलेल्या एका प्रवाशाचा दुभाजकावर डोके आदळून मृत्यू झाला.

या दुर्घटनेत बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर कारंजा (घाडगे) येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तीन मृतदेहांची ओळख पटू शकली नव्हती.
मदतीऐवजी फोटोसेशन
अपघातानंतर या मार्गावरून अनेक वाहने गेली. मात्र, मदतीऐवजी अनेकांनी छायाचित्रे काढून पुढे जाण्यातच धन्यता मानली, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
डोळ्यादेखत पत्नी व बाळ गमावले
मृतांमध्ये श्वेता सुनील पाल (29) आणि त्यांच्या नऊ महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. मूळचे वाराणसी येथील सुनील पाल हे मलकापूरच्या कंपनीत आहेत. बदली झाल्याने ते कुटुंबीयांसोबत नागपूरला जात होते. आग लागताच सुनील यांनी खिडकीतून उडी टाकली. पत्नीसह बाळालाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीच्या ज्वालांनी सुनील यांचे हात भाजले आणि ते पत्नी आणि बाळाला वाचवण्यात असर्मथ ठरले.

अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समधून सुनील पाल, पत्नी श्वेता हे बाळासह प्रवास करत होते. या दुर्घटनेत श्वेता व बाळाचा मृत्यू झाला तर सुनील कसेबसे बचावले.
दगड आडवे लावून मदतीसाठी थांबवले
कारंजा येथील रितेश गुप्ता प्रवासी बसमधून सुखरूप उतरू शकले. त्यांच्यासह काही प्रवाशांनी इतर वाहनांकडे मदतीची मागणी केली, पण एकही वाहन थांबत नव्हते. अखेर दगड आडवे लावून एक ट्रॅव्हल्स थांबवली व इतर प्रवासी त्यात बसून पुढे निघून गेले.
नऊ महिन्याच्या बाळासह बसमधील 5 जणांचा मृत्यू

कारण गुलदस्त्यात
ही आग नेमकी कशामुळे लागली हे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याचा तपास केला जात असल्याचे तळेगावचे ठाणेदार दिनेश झांबरे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.