आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात एकाच रात्री फोडली सहा दुकाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संकुलातील पाच कृषी सेवा केंद्रांसहित अन्य एक दुकान फोडले. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या चोर्‍या सोमवारी उघडकीस आल्या. चोरट्यांनी यामध्ये 95 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला असून, यामुळे व्यापार्‍यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या व्यापारी संकुलात सतीश राधाकिसन कलंत्री (43, रा. गाडगेनगर) यांचे तिरुपती कृषी सेवा केंद्रातून चोरट्यांनी 14 हजार 700 रुपयांची रोख लंपास केली. या दुकानास लागून संजय गोविंद ठाकरे यांच्या साई कृषी सेवा केंद्रामधून 400 रुपये, सचिन बाबुराव उनकर यांच्या रेणुका अ‍ॅग्रोमधून 400, राजेश जानरावजी धामनकर यांच्या महालक्ष्मी सीड्समधून एक हजार 400 रुपये आणि नंदकिशोर मधुकरराव वाठ यांच्या श्री अंबे अ‍ॅग्रोमधून 12 हजार 600 रुपये, अशी एकूण 29 हजार 500 रुपयांची रोख चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडून लंपास केली. त्यानंतर मोर्शी रोडवरील गाडगेबाबा संकुलाकडे मोर्चा वळवला. येथे अजित राजेंद्रकुमार जैन यांचे लँड डेव्हलपर्सचे कार्यालय असून, चोरट्यांनी तेथून लॅपटॉप, प्रिंटर, मोडेम आणि सीसीटीव्ही कॅमेरा, असा एकूण 66 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी व्यापारी संकुलांमधील दुकानांनाच ‘टार्गेट’ केले आहे. सहा दुकानांमधून त्यांनी एकूण 95 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. संबंधित दुकानदार सोमवारी सकाळी आपल्या दुकानांमध्ये पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. गाडगेनगर पोलिस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपासास सुरुवात केली आहे.
दुष्काळात तेरावा महिना
यंदा पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती हलाखीची आहे. शेतकरी पावसाअभावी कासावीस झाले आहेत. अशा स्थितीत कृषी सेवा केंद्र विक्रेत्यांचा व्यवसाय दरवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. यातच, त्यांना चोरट्यांचा फटका सहन करावा लागला आहे.
पोलिसांची गस्त कोठे?
शेगाव नाका ते जुने कॉटन मार्केट व मोर्शी रोड हा गजबजलेला परिसर असून मुख्य रस्त्यावर आहे. पोलिसांची रात्र गस्त सुरू असते. तरीही, मुख्य मार्गावरील सहा दुकानं फोडून चोरटे पसार होतात. त्यामुळे पोलिसांची रात्र गस्त नेमकी कोठे, असा सूर नागरिकांमध्ये उमटला आहे.

चोरट्यांचा शोध सुरू, लवकरच जेरबंद
एकाच दिवशी सहा दुकानांमध्ये चोरी झाली, ही गंभीर बाब आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहेत. चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्यात येईल.
लतीफ तडवी, सहायक पोलिस आयुक्त.