आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेन्टेनन्स कमांडकडून भविष्यात विमाननिर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वायुसेनेच्या विमानांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी वाहणार्‍या मेन्टेनन्स कमांडकडून भविष्यात विमाननिर्मिती होऊ शकते. कमांडच्या नाशिक येथील बेस रिपेअर डेपोकडे (बीआरडी) येत्या वर्षभरात विमानांच्या जुळवणीची जबाबदारी येणार असून, ते या दिशेने पहिले पाऊल असेल, अशी माहिती मेन्टेनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल पी. कनकराज यांनी दिली.

वायुसेनेच्या 81 व्या वर्धापनदिन निमित्ताने एअर मार्शल कनकराज यांनी या वेळी मेन्टेनन्स कमांडमधील ताज्या घडामोडींची माहिती दिली. देशात संरक्षण विमानांची निर्मिती करणार्‍या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडवर (एचएएल) विविध प्रकल्पांचा मोठा बोजा आहे. त्यामुळे संशोधन आणि विकास कार्याकडे ते पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून कनकराज म्हणाले, थेट विमाननिर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करणारी ही जगातील पहिलीच वायुसेना असेल. त्याची सुरुवात नाशिकजवळील ओझर येथील बेस रिपेअर डेपोत विमानांच्या जुळवणीच्या कामाने होणार आहे. सुरुवातीला वायुसेनेसाठी मानवरहित विमाने (यूएव्ही) तसेच प्रशिक्षण वर्गातील विमानांच्या जुळवणीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर कालांतराने थेट विमानांच्या निर्मितीची जबाबदारी घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या मेन्टेनन्स कमांडने एएन-32 या विमानांच्या अपग्रेडेशनची मोहीम हाती घेतली आहे. 2011 पासून सुरू झालेली ही मोहीम नियोजनातील विलंब तसेच रशियातून सुट्या भागांच्या पुरवठय़ाच्या अडचणींमुळे माघारली आहे. काही विमाने युक्रेन येथे, तर काही कानपूर येथील बेस रिपेअर डेपोत अपग्रेड केली जात आहेत.

जवळपास 28 विमानांचे अपग्रेडेशन पूर्ण झाले असल्याची माहिती एअर मार्शल कनकराज यांनी या वेळी दिली.

संरक्षण सामग्रीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वेळेत अंगीकार करण्यात आपण निश्चितपणे मागे पडत आहोत, याची कबुली देताना एअर मार्शल कनकराज यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात आपल्यापुढे पर्याय नव्हते. सोव्हिएत रशियाच्या विघटनाचा सर्वात वाईट परिणाम भारतीय वायुसेनेच्या युद्धसामग्रीच्या सज्जतेवर झाला. विमानांची सर्वच उपकरणे एका छताखाली उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. आता विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून खासगी क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले जात असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळवणे सोयीचे होणार आहे. मेटेनन्स कमांडमध्ये उपकरणे आणि सुट्या भागांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात भारतीय तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्याचे प्रयत्न सुरूआहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

ई-मेन्टेनन्स प्रकल्प

मेन्टेनन्स कमांडच्या देशभरातील बेस रिपेअर डेपोंचे काम भविष्यात पूर्णपणे पेपरलेस होणार आहे. त्यासाठी विप्रोसोबत 950 कोटींच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक मेन्टेनन्स प्रकल्पावर काम सुरू आहे. सर्वच काम संगणकीकृत होणार असल्याने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांना गती येऊन ती आटोपशीर होतील, असेही त्यांनी सांगितले.

नागपुरात पुन्हा होणार एअर शो

वायुसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागपुरात या महिनाअखेर एअर शो चे आयोजन होणार आहे. त्यात प्रथमच महाकाय असे सी-130जे हे अत्याधुनिक विमान पाहण्यासाठी ठेवले जाणार आहे. याशिवाय सारंग हेलिकॉप्टर्स चमूच्या चित्तथरारक हवाई कसरतीदेखील आयोजित होणार आहेत. मात्र, नागपुरातील हवामानावर या आयोजनाचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे एअर मार्शल कनकराज यांनी स्पष्ट केले.