आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aam Adami Party News In Marathi, Nagpur, Arvind Kejriwal

प्रमुख पक्षांना ‘आम आदमी’चे उपद्रवमूल्य जाणवण्याची चिन्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाचे गारूड समाजावर असल्याची प्रचिती त्यांच्या पूर्व विदर्भाच्या दौर्‍यातून आली. आपचे कुठलेही नेटवर्क नसताना त्यांच्या प्रचार कार्यक्रमांना लाभलेला प्रतिसाद स्थानिक नेत्यांना समाधान देणारा ठरला आहे. त्यातून आगामी निवडणुकीसाठीचे निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार असले तरी काँग्रेस आणि भाजप या बड्या पक्षांना आपचे उपद्रवमूल्य निश्चितपणे जाणवणार, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

मागील तीन वर्षात केजरीवाल यांचा हा तिसरा नागपूर दौरा होता. यापूर्वीच्या नागपूर भेटीत केजरीवाल यांची कुणी फारशी दखल घेतली नव्हती. मात्र, या दौर्‍याचे वैशिष्ट्य असे की, त्यांचे आकर्षण असल्याचे जाणवले. व्यवस्थेबद्दल नाराजी, चीड असलेल्या या वर्गासाठी ते आशेचा केंद्रबिंदू ठरले असल्याचे दिसत होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत लाभलेले यश, त्यामागील केजरीवाल यांच्यासारख्या साध्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या व्यक्तीचे कर्तृत्व, ही त्यांच्याबद्दल अलीकडेच निर्माण झालेल्या आकर्षणाची प्रमुख कारणे मानता येतील.

नागपुरातील रोड-शो आणि त्यानंतर सभेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. एरवी लाखभर श्रोत्यांची गर्दी अनुभवणार्‍या कस्तुरचंद पार्कवर या वेळी गर्दीचे फसवे चित्र नव्हते. जे आले ते स्वयंस्फूर्तीने आणि मनात उत्सुकतेचे भाव घेऊनच आले होते. सर्वसामान्यांना लगेच पटणार्‍या मुद्द्यांचा आधार घेत केजरीवाल यांनीही आपल्या जोशपूर्ण भाषणातून भावनिक साद घालण्याचे प्रयत्न केलेत. त्याला भरपावसातही दाद मिळाली. सभेनंतरही त्यांनी मांडलेल्या विषयांची चर्चा होतच राहिली. त्यामुळे जेमतेम बाळसे धरलेल्या आपच्या दृष्टीने केजरीवाल यांचा हा प्रचार दौरा बर्‍यापैकी यशस्वी ठरल्याचे मानले जाते. मात्र, तीन आठवड्यांनंतर होणार्‍या निवडणुकीत केजरी इफेक्ट आणि आपबद्दलच्या वाढत्या आकर्षणाचा लोकसभेच्या उमेदवारांना कितपत लाभ होणार, याचे अंदाज बांधणे सध्यातरी घाईचे ठरणार आहे. उमेदवारांच्या व्यक्तिगत प्रचाराला सध्या मिळत असलेल्या प्रतिसादाचे स्वरूप सध्यातरी किरकोळ असेच आहे.