आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे अनोखे दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील वारकरी दिंड्या पंढरपूर जवळ करीत आहेत. दिवसा मशिदीत अल्लाहचे स्मरण आणि रात्री मंदिरात वास्तव्य करून भगवंतासमोर तपश्चर्या करणार्‍या गणोरी येथील श्री परमहंस महंमदखान महाराजांची दिंडी पंढरपूरला जात असून सध्या सर्वांचे आकर्षण बनली आहे. ही दिंडी हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे दर्शन घडवत आहे.
संत तुकाराम महाराजांचे समकालीन असलेले अमरावती जिल्ह्यातील गणोरी येथे श्री परमहंस महंमदखान महाराज हे मुस्लिम समाजातील वारकरी संप्रदायाचे संत होऊन गेले. ‘सृष्टीचा निर्माता एकच आहे’ या ठाम विश्वासातून महंमद महाराजांनी हिंदू-मुस्लिम धार्मिक ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्या काळी केला. स्वत:ला झालेल्या अनुभूतीमुळे त्यांना विठ्ठलाची भक्ती जडली आणि महंमदखान ‘श्री महंमद’ झाले. गणोरी येथील भाविकांकडून काढण्यात येणारी ही दिंडी 15 ते 20 वर्षे बंद पडली होती, परंतु 2006 पासून पुन्हा नव्या जोमाने भाविकांनी महंमद आणि विठ्ठलाची भेट घालून देण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

मुस्लिम संताची एकमेव दिंडी असावी
‘वारकरी संप्रदायामध्ये सुमारे 30 लहान-मोठे मुस्लिम संत होऊन गेले. त्यांच्या दिंड्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जात असल्याचे दिसत नाही. गणोरी येथून आम्ही सहा वर्षांपासून न चुकता दिंडी घेऊन जातो. हे 7 वे वर्ष असून मुस्लिम व हिंदू धर्मात एकोपा निर्माण करण्याचा यामागचा उद्देश आहे. विठ्ठलचरणी लीन होणारी मुस्लिम संताची ही एकमेव दिंडी असावी.
अनिल देशमुख, वारकरी, रा. गणोरी, जि. अमरावती.