आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधी समजून डॉक्टरने बाळांना पाजले ‘अ‍ॅसिड’; दोन चिमुकल्‍यांची प्रकृती गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दोन चिमुकल्या बाळांना डॉक्टरांनी औषधी समजून अ‍ॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली. दोन्ही बाळांची प्रकृती गंभीर असून नागपूरच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील केसलेवार प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सिलोटवार येथे लसीकरणाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. चक्रधर कन्हैया भेदे (9 महिने) आणि मुस्कान दिनेश मेश्राम (18 महिने) या दोन चिमुकल्यांनाही या लसीकरणासाठी त्यांच्या आईने गावातील अंगणवाडीत आणले होते. यावेळी डॉक्टरांनी 9 महिन्यांच्या चक्रधरला गोवरची, तर मुस्कानला डीपीटीची लस पाजली. त्यानंतर या बालकांना बाटलीतील औषधी जीवनसत्त्वाची समजून अ‍ॅसिड पाजण्यात आले.

काही वेळानंतर दोन्ही लहान बालकांचे ओठ काळे पडले. तोंड आतून भाजले आणि तोंडाच्या बाहेरची त्वचाही जळाली. हा प्रकार तेथे उपस्थित डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर बालकांना तातडीने तुमसरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. तुमसरमध्ये त्यांच्यावर एक दिवस उपचार करण्यात आला, परंतु मुलांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने नागपुरातील कोलंबिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या दोन्ही बालकांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर उपचाराचा पूर्ण खर्च मिळण्याची मागणी बालकांच्या पालकांनी केली आहे. तसेच संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.