आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींकडून मोठ्या मतदानाचे चित्र खोटेच - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गडचिरोलीतील आदिवासींनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग दर्शवल्याचे खोटे चित्र निर्माण करण्यात येत आहे. प्रत्यक्षात तेथे सुरक्षा दलांच्या माध्यमातून सरकारी मतदान पार पाडण्यात आले, असा खळबळजनक आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना केला.

आंबेडकर म्हणाले, गडचिरोलीतील परिस्थिती सार्‍यांनाच माहिती आहे. त्यामुळे मतदानाच्या तीन दिवस अगोदरच लष्कर आणि निमलष्करी दलांनी दुर्गम भागाचा ताबा घेतला होता. सुरक्षा दलांच्या भरवशावर किमान सहाशे दुर्गम गावांमध्ये सरकारी मतदान पार पडले. त्यामुळे आदिवासींनी मोठ्या प्रमाणात मतदानात सहभाग दर्शवल्याचे खोटे चित्र निर्माण करण्यात येत आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील अनेक उमेदवार प्रचारासाठी दुर्गम भागापर्यंत पोहोचू शकलेले नव्हते. अनेक उमेदवारांनी आपल्याशी बोलून सरकारी मतदानाची माहिती दिली, असा दावाही त्यांनी केला.

ईव्हीएमवरही शंका
विदर्भातील निवडणुकीनंतर जागांचे अंदाज बांधणे या वेळी अतिशय कठीण आहे. भंडारा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात जबरदस्त नाराजी दिसली. त्याही परिस्थितीत ते निवडून आल्यास मतदान यंत्रांच्या चिप्स तपासाव्या लागतील, असा दावाही आंबेडकरांनी केला.