आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींची संघ मुख्यालयात नेत्यांशी बंदद्वार चर्चा,मोदींबद्दलच्या मुद्द्याला मात्र बगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघ नेत्यांशी अतिशय सार्थक चर्चा झाली, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संघ मुख्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केला. मोदींबद्दलच्या त्यांच्या नाराजीसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी नेमकी बगल दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भाजप नेत्यांच्या ‘दरबारातील’ भेटींमुळे संघ मुख्यालयातील वर्दळ अचानक वाढली आहे. दिल्लीतील राजीनामा नाट्यानंतर अडवाणी यांनी सरसंघचालकांच्या मध्यस्थीला मान देत माघार घेतली होती. त्याच वेळी संघ नेते आणि अडवाणी यांच्यातील चर्चेची फेरी नागपुरात घेण्याचे ठरले होते. त्या पार्श्वभूमीवर अडवाणींनी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास महाल परिसरातील संघाचे मुख्यालय गाठले.

दिवसभर अडवाणी यांचा मुक्काम मुख्यालयातच होता. लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर संघ नेत्यांशी सार्थक चर्चा झाली असे आडवानी यांनी यावेळी सांगितले. संघापासून जनसंघ आणि नंतर भाजपची उत्पत्ती झाली. त्यामुळे संघ आणि भाजपचे संबंध जुने आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षांपासून आपण संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहोत याकडे लक्ष वेधताना संघ नेत्यांशी विचारांचे आदानप्रदान नेहमीच होत असते असेही अडवाणी यांनी सांगितले. आपला दौरा अतिशय सार्थक राहिला असे सूचक विधान करताना त्यांनी मोदीबद्दलच्या नाराजीवर विचारलेल्या प्रश्नाला नेमकी बगल दिली.


दोन तास चर्चा
० सरसंघचालक मोहन भागवत तसेच सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी दोन तास चर्चा.
० चर्चेचा नेमका तपशील बाहेर नाही. पण सायंकाळी पाच वाजता अडवाणींनी बाहेर येऊन दौ-याचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला.


पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी?
या बैठकीत अडवाणींनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केल्याचा कयास संघ आणि भाजपच्या वर्तुळात लावला जात आहे. भाजपनेत्यांशी बोलून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन संघाच्या नेत्यांनी दिले असल्याचेही मानले जाते.


जोशींनंतर अडवाणी!
गुरूवारी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनीही अचानक नागपुरात दाखल होत संघ नेत्यांशी बंदद्वार चर्चा केली होती. जोशी हे देखील मोदीविरोधी भूमिका बाळगून असलेले नेते मानले जातात.


आज राजनाथसिंग येणार
जोशी, अडवाणी यांच्यापाठोपाठ शनिवारी भाजपाध्यक्ष राजनाथसिंग नागपुरात दाखल होत आहेत. ते दिवसभर संघमुख्यालयातच मुक्काम करणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.