आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Police Now Government Treat Us Unfair, Jadhav Families Bad Tale

पोलिसांनंतर आता सरकारकडूनही आमच्यावर अत्याचार, जवखेडे हत्याकांडातील पीडितांची व्यथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: विविध आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी विधान भवनासमोर धडक देत दलित अत्याचार थांबवण्याची मागणी केली.
नागपूर - ‘एकाच परिवारातील तिघांची हत्या करून लोकांनी अत्याचार केला. त्यानंतर भावाच्या हत्येत भावांनाच गोवून आधी पोलिस आणि आता सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे,’ अशी व्यथा जवखेडे हत्याकांडातील पीडित जाधव कुटुंबीयांनी मांडली. दरम्यान, ख-या आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी आंबेडकर संघटनांनी बुधवारी नागपुरात विधान भवनावर मोर्चा काढला होता. यात जाधव कुटुंबीयही सहभागी झाले होते.

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथे संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री जाधव आणि मुलगा सुनील जाधव यांची निर्घृण हत्या झाली होती. या हत्याकांडात आरोपी सापडत नसल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. त्यानंतर पोलिसांनी संजयचे भाऊ प्रशांत जाधव आणि अशोक जाधव यांनाच अटक केली. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी अहमदनगर पोलिसांनी कौटुंबिक वादातून जवखेडे हत्याकांड घडल्याचा खुलासा केला आणि मृत संजयचे भाऊ प्रशांत आणि अशोक यांना अटक केली, असे आरोप मृत संजयचे वडील जगन्नाथ जाधव, आई साखराबाई जगन्नाथ जाधव आणि आरोपी केलेल्या प्रशांतची पत्नी शीतल जाधव यांनी नागपुरात केला.

‘या हत्याकांडामागे दुसरे आरोपी आहेत. त्यांची नावे आम्ही पोलिसांना सांगितली आहेत. परंतु पोलिस त्यांना न पकडता आमच्या परिवारातील सदस्यांनाच धरपकड करीत आहे. आरोपी केलेले प्रशांत आणि अशोक यांनी पोलिस तपासात सर्वतोपरी मदत केली. परंतु आज पोलिसांनी त्यांनाच आरोपीच्या कठड्यात उभे केले. पोलिस ख-या आरोपींना वाचवण्यासाठी आमच्या परिवारातील सदस्यांना यात गोवत आहे. एकदा लोकांनी आमच्यावर अत्याचार केले आणि सरकार आमच्यावर अत्याचार करीत आहेत’ असा आरोपही जाधव कुटुंबियांनी केला.

सत्तापिपासूंना धडा शिकवा
‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात खैरलांजी आणि जवखेडे हत्याकांडासारखे प्रकार घडत असताना स्वत:ला आंबेडकरी नेते समजणारे झोपलेले आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी आंबेडकर चळवळीचे तुकडे पाडणा-या नेत्यांना समाजाचे दु:ख काय दिसणार?’ असा प्रश्न उपस्थित करीत विविध आंबेडकरी संघटनांनी बुधवारी विधान भवनावर मोर्चा काढला होता. असेच सत्तालोलुप नेतृत्व राहिल्यास असंघटित समाजावर असेच अत्याचार होत राहतील, अशी भावनाही या वेळी व्यक्त करण्यात आली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणवणारे नेते आज भाजप, काँग्रेसने फेकलेल्या उष्ट्यावर जगत आहेत. अशा नेत्यांना आज धडा शिकवण्याची गरज असून समाजबांधवांनी एकजूट होण्याची गरज आहे,’ अशी भावना मोर्चात व्यक्त केली. मोर्चाचे नेतृत्व भिक्खू संघाने केले. संध्याकाळी भिक्खूंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी जाधव कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची विनंती केली.