यवतमाळ - येथील पोस्टल मैदानावर आज महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाचकंदील चौकात विदर्भ कनेक्ट संघटनेने विदर्भाचा ध्वज फडकवला. या वेळी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी घोषणा देण्यात आल्या. स्मिता सरोदे यांनी उपस्थितांना विदर्भ हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी शपथ दिली. या वेळी अॅड. वीरेंद्र दरणे, शाहीद सिद्दीकी, संजय आकोलकर, शकील अहमद, सुजित राय, बाळासाहेब सरोदे, शिवदास मानकर, राजेश चव्हाण, दिनेश पाटील, किरण जयस्वाल, दासभाई सुचक, अॅड. अमोल बोरखडे, राधामल जाधवाणी यांच्यासह अनेक विदर्भवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावरून आज, मे रोजी विदर्भवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने जुन्या महिला रुग्णालयाजवळील चौकात नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात प्रकाश पांडे, कृष्णराव भोंगाडे, बाळासाहेब निवल, जयंतराव बापट, प्रदीप धामणकर, संजय मेश्रामसह अनेक आंदोलक सहभागी झाले होते.
जांबुवंतराव धोटेंनी केला चक्काजाम
स्वतंत्रविदर्भाच्या मागणीसाठी भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी आज बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन केले. यानंतर मोर्चा काढून बसस्थानक चौकाला घेराव करण्यात आला. या आंदोलनात विजयाताई धोटे, क्रांती राऊत, लालजी राऊत, प्रभाकर काळे, मोतीराम यांच्यासह मोठ्या संख्येत विदर्भवादी सहभागी झाले होते. यवतमाळ शहर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले होते.
(फोटो : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी महाराष्ट्र दिनी आंदोलन करताना विदर्भवादी कार्यकर्ते)