आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहर: सोयाबीनसाठी रस्त्यावर उद्रेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - परतीच्या पावसाने सोयाबीनला फटका बसल्याने शासनाने शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी प्रहार संघटना आणि शिवसेनेने शहरात व जिल्ह्यातील विविध भागांत बाजारपेठ बंद तसेच ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या वेळी शहरातील 80 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

शहरातील राजकमल चौकात प्रहारच्या आंदोलकांनी सकाळी 11 च्या सुमारास काही वेळासाठी ‘रास्ता रोको’ केला. तत्पूर्वी, आंदोलकांनी व्यापार्‍यांना दुपारी एकपर्यंत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्या आवाहनाला शहरात फारसा प्रतिसाद मिळाला नाही. बाजारपेठ सुरळीत सुरू होती. याच दरम्यान माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात बडनेरा येथील यवतमाळ टी-पॉइंटवर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या वेळी यवतमाळच्या दिशेने जाणारी व येणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. या वेळी बडनेरा पोलिसांनी माजी आमदार संजय बंड यांच्यासह 47 आंदोलकांना ताब्यात घेतले. दुपारी एकच्या सुमारास प्रहारच्या आंदोलकांनी रहाटगाव टी-पॉइंटवर नागपूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ केला. मात्र, प्रत्येक ठिकाणी असलेली पोलिसांची प्रचंड कुमक लक्षात घेता आंदोलन अधिक काळ झाले नाही. त्यामुळे प्रवाशांचा कोणत्याही ठिकाणी खोळंबा झाला नाही. कोतवाली व नांदगावपेठ पोलिसांनी प्रहारच्या 33 आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये प्रहारचे शहराध्यक्ष धीरज जयस्वाल, वसू महाराज, प्रदीप चांगोले आदींचा समावेश होता. नवाथे चौकात काही आंदोलकांनी टायर जाळून रोष व्यक्त केला.
बसस्थानकाजवळ झालेल्या आंदोलनामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक खोळंबली होती. सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, मूग पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची नुकसानभरपाई शेतकर्‍यांना देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय बंड, नाना नागमोते, महेश भिंडा, ललित झंझाड, राजू धामले, मंगेश गाले, किशोर पवार, स्वप्निल धोटे, सचिन कैथवास, बाबूशेठ सिंगई, किरण अंबाडकर, राजू दारोकार, तुषार अंभोरे, मारुती पोकळे, आशीष दारोकार, नीलेश सावळे, आशीष धर्माळे, अमोल निस्ताने, उमेश घुरडे, संजय पळसोदकर, राहुल माटोडे, अनिल नंदनवार, गजानन डोंगरे, वसंत गौरखेडे, सुनील राऊत, संदीप पवार, बंडू धामणे, राजू जोशी, अनिल मोहोड, बंडू वानखडे, डॉ. कृष्णराव पवार, धर्मेंद्र मेहरे, अविनाश सनके, राजू परिहार, दिलीप डांगे, प्रवीण विधाते, स्वराज ठाकरे, प्रवीण अळसपुरे, श्याम देशमुख आदी उपस्थित होते.

बेलोरा येथेही शिवसैनिकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग
शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची मागणी करीत आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. शुक्रवारी बेलोरा येथे आंदोलन झाले. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. आमदार अभिजित अडसूळ यांच्यासह जिल्हाप्रमुख तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेता प्रा. प्रशांत वानखडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण हरमकर, नगरसेवक दिगंबर डहाके, नगरसेवक डॉ. राजेंद्र तायडे, राजू मानकर, भैया बरबट, अभिजित वडनेरे, पराग गुडधे तसेच शिवसेना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.