आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहा यांच्या वक्तव्यावर विदर्भवादी संतापले, भाजपविराेधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून हात वर केल्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी अाग्रही असणाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. अाजवर ‘मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाला थोडा वेळ देऊया’, अशी भूमिका विदर्भवाद्यांनी घेतली होती. मात्र, शहा यांच्या वक्तव्यामुळे विदर्भवादी चांगलेच संतापले अाहेत. ‘यापुढे हा प्रकार सहन करणार नाही. वेगळ्या विदर्भावरून हात वर करणाऱ्यांच्या कानाखाली वाजवल्याशिवाय राहाणार नाही’, असा इशारा ‘विदर्भ माझा’चे संयोजक चंद्रकांत वानखेडे यांनी दिला अाहे.

विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी ‘विदर्भ हवा असेल तर जनतेने रस्त्यावर उतरावे’, असे आवाहन केले. भाजपाध्यक्ष शहा यांनी केलेले वक्तव्य अतिशय अभ्यास शून्य अाहे. भूवनेश्वर येथील कार्यकारिणीत पारित झालेला ठराव, जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन शहा विसरले काय?, असा सवाल धोटेंनी केला.

विदर्भ राज्य नवनिर्माण महासंघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दीपक निलावार तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. आता रास्ता रोको तसेच नेत्यांच्या घरावर मोर्चे काढण्याशिवाय पर्याय नाही, असे निलावार यांनी सांगितले. १ जून रोजी यवतमाळ येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा संमेलन आहे. या संमेलनात आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात येईल, असे नेवले यांनी सांगितले.

नितीन गडकरींकडून सारवासारव
अमित शहांच्या वक्तव्यामुळे ताेंडघशी पडलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अाता सारवासारव करण्याचा प्रयत्न सुरू केला अाहे. ‘भाजप नेहमीच विदर्भाच्या बाजूने राहिला अाहे. शहा यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात अाला. भुवनेश्वर येथील बैठकीत पक्षाने वेगळ्या विदर्भाचा ठराव केला अाहे,’ हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...