आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All 18 Accused Of Akku Yadav Murder Case Acquitted

कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्यातून सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - कुख्यात अक्कू यादव हत्याकांडाचा अखेर १० वर्षे २ महिन्यांनी सोमवारी निकाल लागला. नागपूर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी या प्रकरणातील अठराही आरोपींची निर्दोष सुटका केली. सुनावणीकाळात तीन आरोपींचा मृत्यू झाला, हे विशेष.

अक्कूच्या गुंडगिरीला वैतागलेल्या संतप्त जमावाने १३ ऑगस्ट २००४ रोजी सुमारास जिल्हा न्यायालयात ठेचून खून केला होता. त्याच्या शरीरावर एकूण ७३ जखमा होत्या.जमावाने अक्कूचे घरही जाळले होते. प्रकरणात चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. चारच साक्षीदारांवर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने निकाल देतांना सांगितले.

कोण होता अक्कू यादव ?
भारत उर्फ अक्कू कालीचरण यादव १९९१ पासून नागपुरातील कस्तुरबानगर परिसरात सक्रीय होता. त्याच्याविरूद्ध बलात्कार, खून, चोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणीचेे २५ गुन्हे होेते. दहशतीमुळे बलात्कार व छेडछाडीची प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती.
अक्कू यादवला नेमके कोणी मारले?
न्यायालयाच्या कक्षात घडलेल्या हत्याकांडाच्या तपासाचा दबाव पोलिसांवर होता, तरीही पोलिसांनी तपासात अनेक त्रुटी ठेवल्या. पोलिसांनी पहिला रिपोर्ट घटना घडल्यानंतर तीन तासांनी नोंदवला. शिवाय आरोपींकडून शस्त्रे ताब्यात घेताना वापरण्यात आलेले पंच न्यायालयात टिकू शकले नाहीत. प्रत्यक्षदर्शी दामोदर चौधरी याने घटनास्थळ दाखवल्याची माहिती घटनास्थळाच्या पंचनाम्यात आहे. परंतु न्यायालयात साक्ष देताना चौधरी यांनी आपण पोलिसांना घटनास्थळ दाखवले नसल्याचे सांगितले. याशिवाय आरोपींची ओळखपरेड सदोष असल्याने न्यायालयाने पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. परंतु अक्कूला मारले कोणी? हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. न्यायपालिकेच्या इमारतीत झालेल्या खुनात एकालाही शिक्षा होऊ नये? हे पोलिस आणि न्यायपालिकेचे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशी चर्चा न्यायालय परिसरात होती. १३ ऑगस्ट २००४ रोजी नागपूर जिल्हा न्यायालय आवारातील ऐतिहासिक दगडी इमारतीमधील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये अक्कू यादवचा शेकडोच्या संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती व काचेने भोसकून व दगडाने ठेचून खून केला होता. यात पोलिसांनी २१ जणांविरुद्ध कारवाई केली होती.
पोलिसांचा वरदहस्त
अक्कूला ७ ऑगस्ट २००४ रोजी अटक करण्यात आली. १३ ऑगस्ट २००४ रोजी त्याची हत्या करण्यात आली. यादरम्यान तो पाेलिस कोठडीत होता. शवविच्छेदनात त्याच्या पोटात १०० मिली दारू सापडली. यावरून असे स्पष्ट होते की, पोलिस कोठडीत अक्कूला दारू पुरवली जात होती. पोलिसांच्या आशीर्वादामुळे अक्कूने लोकांचा छळ केला. लोकांची सहनशक्ती संपली व त्यांनी अक्कूचा खात्मा केला, असा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
वर्गणी गोळा करून आरोपी खटला लढले
प्रकरणातील आरोपी असलेल्या २१ जणांपैकी बहुतांश मोलमजुरी करणारे आहेत. वकिलाला एकरकमी ५ हजार रुपये देण्याचीही ऐपत नव्हती. अशा वेळी वकिलांना पैसे देण्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली. खटल्याचा अर्ध्यावर खर्च प्रोफलाइन या विदेशी कंपनीच्या संचालकांनी उचलला.
नागपुरात आतापर्यंत लोकांच्या संतापाचे बळी ठरलेले गुंड
- महिलांचा लैगिंक छळ करणारा कुख्यात गुंड गफ्फार डॉनची १९९८ मध्ये गळ्यात टायर बांधून हत्या.
- खंडणीबहाद्दर बबलू लंगड्याची वाठोडा परिसरात १९९८ मध्ये दगडाने ठेचून हत्या.
- खंडणी, चोरी, लूटमार प्रकरणातील आरोपी रणजित दहाट याला १९९९ मध्ये मारहाण आणि जाळून हत्या.
- १९९९ मध्ये कुख्यात गुंड अजीज भुऱ्याची जाळून हत्या.
पुढील स्लाइडवर पाहा, कोर्टाच्या निर्णयानंतर लोकांना झालेल्या आनंदाचे आणि घटनेनंतरचे सुमारे दहा वर्षांपूर्वीचे PHOTO