आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती -इंदूर येथून 14 हजार लिटर स्पिरिट घेऊन निघालेला एक टँकर बुधवारी दिवसभराच्या यशस्वी ऑपरेशननंतर मुंबई आणि अमरावती राज्य उत्पादन शुल्क पथकांनी संयुक्त कारवाईत पकडला. या वेळी अकोल्याच्या दोघांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले. टँकर आणि डस्टर कार जप्त करण्यात आली आहे.
गजानन पुंडलिक मेहसरे (45, रा. देवकाबाईनगर, अकोला), अविनाश रामभाऊ पाटील (42, रा. सांगाजी प्लॉट, अकोला) आणि टँकरचालक इम्रान युसूफ बेग (23, रा. खारवाडी मोहल्ला, छेदना, मध्य प्रदेश) या तिघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. इंदूरहून निघालेल्या टँकरमधून (सीजे 04/ 8970) अवैध स्पिरिट नेले जात असल्याची माहिती मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याच्या आधारे मुंबईचे पथक मागील तीन ते चार दिवसांपासून या टँकरच्या शोधात होते. बुधवारी सकाळपासून मूर्तिजापूर परिसरात शोधमोहीम सुरू होती. याच दरम्यान पथकाला हा टॅँकर दिसला. या वेळी टँकरच्या मागेच डस्टर कारही होती. पथकाला या कारमधील व्यक्तींवरही संशय असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. 14 हजार लिटर स्पिरिट किमान 50 लाख रुपयांचे असल्याचा अंदाज उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.
स्पिरीट कोणाच्या मालकीचे आहे, कोणत्या ठिकाणी जात होते, यामध्ये कोण सहभागी आहेत, या सर्व बाबींचा शोध अधिकारी घेणार आहेत. या कारवाईत मुंबई पथकाचे उपनिरीक्षक शेवाळे व त्यांचे पथक तसेच अमरावती येथील पथकाचे निरीक्षक आर. बी. आमझरे, एस. जी. बेदरकर, एस. जी. ठाकरे, रवि राऊतकर, संजय देशमुख, सुनील सोनवणे, संजय देहाडे, अंकुश काळे, मधुकर खोड आदींनी सहभाग घेतला.
बॉक्स
स्पिरीटचा उपयोग दारूसाठी
सदर स्पिरीट अवैध असल्याचा संशय असल्यामुळेच आम्ही टँकरसह जप्त केले आहे. याच वेळी टँकरच्या आजूबाजूने असलेली डस्टर कारसुद्धा जप्त करण्यात आली आहे. यावेळी तिघांना ताब्यात घेतले असून, उद्या (दि. 26) त्यांना मूर्तिजापूर न्यायालयात हजर करण्यात येईल. स्पिरीटचा उपयोग दारूसाठी करण्यात येतो. त्यामुळे हे स्पिरीटसुद्धा दारूसाठी जात होते का, याचा शोध आम्ही घेत आहोत.
आर. बी. आमझरे,
निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.