आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरपत्रिकांमधील गुणांचा ताळमेळ साधताना खोडाखोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गोपनीय विभागात पोलिसांनी शोधून काढलेल्या १३ उत्तर पत्रिकांमध्ये गुणांचा ताळमेळ साधताना खोडतोड झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. परीक्षकांकडून ही खोडतोड होण्याची शक्यता असल्याने या उत्तर पत्रिकांचा गुणवाढ प्रकरणाशी संबंध नसल्याची माहिती देखील समोर आली आहे.

विद्यापीठाच्या गोपनीय विभागात सोमवारी (दि.१३) पोलिसांच्या मोठ्या ताफ्याकडून तब्बल १३ हजार उत्तर पत्रिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये खोडतोड असलेल्या १३ उत्तरपत्रिका पोलिसांच्या हाती लागल्या. या उत्तर पत्रिकांचा गुणवाढ प्रकरणाशी संबंध तर नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. समाज विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. संतोष ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील ३२ (६) चौकशी समितीच्या तातडीने बोलवलेल्या बैठकीत खोडतोड असलेल्या १३ उत्तर पत्रिकांची तपासणी करण्यात आली.
उत्तर पत्रिकांमधील खोडतोड गुण वाढीसाठी झाली नसल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. गुणांची पडताळणी करतेवेळी परीक्षकांकडून अशा प्रकारची खोडतोड होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांना नव्याने आढळून आलेल्या खोडतोड केलेल्या उत्तर पत्रिकांचा गुणवाढ प्रकरणाशी संबंध नसल्याचे समिती सदस्यांचे म्हणणे आहे.

पोलिसांची तपासणी सुरूच
विद्यापीठातीलगोपनीय विभागात पोलीसांकडून आज (१६ एप्रिल) उत्तर पत्रिकांची तपासणी करण्यात आली. मात्र पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. एक पोलिस उपनिरीक्षकासह काही पोलीसांकडून उत्तर पत्रिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी विद्यापीठातील काही अधिकारी देखील उपस्थित होते.