आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षाकाठी दीड हजारांवर शिकारी; वाघांचे रक्षण चोख, मात्र छोटे प्राणी संकटात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वाघ, बिबट किंवा तत्सम प्राण्यांच्या शिकारी रोखण्यात वनविभाग, वन्यजीवप्रेमींना यश आले; परंतु आकाराने लहान, सहजपणे पकडणे शक्य असलेल्या लहान प्राण्यांवरील गंडांतर अद्यापही टळलेले नाही. संपूर्ण जिल्ह्यातून दरवर्षी अशा लहान प्राण्यांच्या दीड हजार शिकारी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भक्कम वनसंपदा असलेला जिल्हा म्हणून अमरावती पश्चिम विदर्भात प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, मोर, ससा, हरिण, रानगवा, सायाळ, हरियलसह अनेक दुर्मीळ पशू-पक्ष्यांनी जिल्ह्याची वनसंपदा समृद्ध आहे; परंतु गेल्या काही वर्षांपासून संवर्धनाचे वलय केवळ वाघ, बिबट्यांपुरते मर्यादित राहिल्याने लहान प्राण्यांच्या होत असलेल्या नाहक शिकारीकडे सपशेल दुर्लक्ष होऊ लागले आहे.

मेळघाटच नव्हे, तर जिल्ह्यातील अन्य संरक्षित वनक्षेत्रांमध्ये हरियल, सायाळ, अस्वल, सांबर, हरिण, तितर, मोर, ससा आणि महाशीर माशांच्या शिकारीचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. मात्र, या शिकारींची कुठेही अधिकृत नोंद नाही, की ओरडही नाही. शिकारीबाबतचे आकडे विचारले, की वाघ आणि बिबट्याची एकही शिकार नसल्याचे वनविभाग छातीठोकपणे सांगते; पण अन्य प्राण्यांचा मुद्दा आला, तेव्हा निरुत्तर होते.
प्राण्यांची मांसविक्री
- मार्डी : बाजाराच्या दिवसाला सशाचे मांस सर्रासपणे विकले जाते. तितर पक्ष्याचेही मांस येथे मिळते.

- नांदगाव खंडेश्वर : मोर, तितर आणि सशांच्या मांस विक्रीसाठी हे ठिकाणही चांगलेच प्रसिद्ध आहे.

- अमरावती : चपराशीपुरातील मांसविक्री बंद असल्याचा दावा केला जातो; पण सशाचे मांस खाण्याचे शौकिन असलेल्यांनी आजही शुक्रवारी फेरफटका मारावा, तर मांस उपलब्ध असते.

- परतवाडा : हरणाचे मांस विकणार्‍यांचा हा मुख्य अड्डा आहे. येथे सशाचेही मांस मिळते. वन विभागातील अनेकांना त्याचा ठावठिकाणाही माहिती आहे.

- रहाटगाव : मोराचे आणि तितरचे मांस विकले जाते. अलीकडेच येथे छापा घालून वन अधिकार्‍यांनी तितर आणि सशांना ताब्यात घेतले. मारेकरी पळून गेलेत.

- तिवसा, तळेगाव : मोर, तितर, सशाचे मांस येथेही उपलब्ध आहे.

- धारणी, चिखलदरा : हरिण, ससा, तितर, मोर आणि मेळघाटात पूर्वी आढळणार्‍या महाशीर या आठ फुटी माशाचे मांस येथे मिळते. मध्य प्रदेशातही जाते.

शिकारीचे प्रमाण प्रचंड
४मेळघाटच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यातून अशा लहान प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण खूप मोठे आहे. प्राण्यांचे अध्ययन करण्यासाठी मी व माझे विद्यार्थी वर्षानुवर्षे जंगलांमध्ये फिरत आहोत. आजही फिरतो. शिकारीचे प्रमाण प्रचंड आहे.
डॉ. गणेश वानखेडे, प्राणिशास्त्र तज्ज्ञ
मोर, तितरांचा बळी
४अलीकडच्या काळात पोहर्‍यात सात मोर मारले गेले. मासेही जंगलातून आणले जातात. अनेक पशू, पक्षी असे आहेत, जे शेड्यूल्ड वनामध्ये आहेत. त्यांच्या शिकारीचे सप्रमाण पुरावेही आहेत.
यादव तरटे, वन्यजीव प्रेमी
बारकाईने लक्ष
४संरक्षित वनक्षेत्रात लहान प्राण्यांची शिकार होणार नाही, याकडे आमचे पूर्ण लक्ष आहे. पूर्वीपासूनच अधिकारी, कर्मचार्‍यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. कुणाजवळ माहिती असल्यास द्यावी, आम्ही कारवाई करू.
नीनू सोमराज, उपवनसंरक्षक
मोरांच्या शिकार प्रकरणाची ‘केस क्लोज’
अमरावती । पोहरा-मालखेड संरक्षित वन परिसरात शिकार करण्यात आलेल्या सात मोरांची ‘केस क्लोज’ करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. ठोस पुरावे नसल्याकारणाने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपवनसंरक्षक नीनू सोमराज यांनी सांगितले. वनक्षेत्राच्या परिसरात विषारी द्रव्याच्या बाटल्या सापडल्याने पाण्याच्या प्रवाहात विष कालवून सात मोरांना मारण्यात आल्याचे सिद्ध झाले होते. चांदूरबाजार वनक्षेत्रात पोहरा-मालखेड संरक्षित वनक्षेत्र आहे. 8 एप्रिल 2014 रोजी या वनक्षेत्रातील चिरोडीजवळ वन्यप्रेमींना सात मोरांची शिकार झाल्याचे आढळले होते. त्यानंतर वन्यप्रेमींनी अधिकार्‍यांना या बाबत तातडीने सूचित केले. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच अधिकार्‍यांनी वन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. घटनास्थळावरून विषारी द्रव्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या. अधिकार्‍यांना शिकार कुणी केली, याचा सुगावाही लागला; परंतु घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यावरही एकही आरोपी वन अधिकार्‍यांना पकडता आला नाही. त्याला कारणही साजेसे होते. हे कारण होते ठोस पुराव्यांच्या अभावाचे. त्यामुळे पोहर्‍यात राष्ट्र ीय पक्ष्याची खुलेआम राजरोसपणे शिकार करणारे आता मोकळे फिरणार आहेत.