आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनपुढे टेकले हात; मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाळा लांबला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील दहा वर्षांच्या तुलनेत यंदा मान्सून लांबल्याने शेतकरी, शेतमजूर चिंतीत आहेत. पेरण्यांसाठी पाऊस कधी येणार, हा प्रश्न स्वत:लाच विचारत शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आकाशात ढग नुसतेच जमतात नि निघून जातात. आशादायी ढगांची मात्र गर्दी होत नसल्याचे चित्र आहे. लांबलेला पाऊस हा कृषिउत्पादन व अर्थशास्त्रावर दूरगामी परिणाम करणारा असल्याच्या प्रतिक्रिया तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत.

जिल्ह्यात 17 जून रोजी सर्वदूर झालेल्या पावसानंतर पुन्हा पाऊस नाही. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा फटका शेतकरी, शेतमजूर व व्यावसायिकांना बसला आहे. मान्सून जर वेळेवर बरसला असता, तर हंगामातील पिकांसाठी शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी केले असते. मात्र, सध्या बियाणे आणि खतांच्या बाजारालाही मरगळ आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आधीच गारपीटग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील बागाईतदारांसह कोरडवाहू शेतकरी, शेतमजुरांसमोरही पावसाअभावी मोठे संकट उभे आहे. शहरात कापड मार्केट, अन्न-धान्याच्या बाजारातही शेतकरी सध्या फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. पावसाअभावी हंगामातील पिकांनी माना टाकल्या, तर आपत्कालीन गुंतवणुकीसाठी पैसा कुठून आणायचा, ही चिंता शेतकर्‍यांना भेडसावत आहे. मे महिन्यात मशागतीपासून ठिबकची कपाशी लावण्यापर्यंत बहुतेक शेतकर्‍यांनी हजारो रुपयांची गुंतवणूक केली आहे. येत्या आठवड्यातही पावसाने दांडी मारली, तर कपाशी जोपासणे कठीणच आहे. शिवाय पेरणी आणि मजुरीसाठीची आर्थिक समस्या शेतकर्‍यांसमोर आहेच.
पावसाअभावी कोलमडते शेतीचे अर्थशास्त्र
४वेळेवर पाऊस झाला नाही, तर कृषिअर्थशास्त्र कोलमडते, विहिरी कोरड्या पडतात, पिकं करपतात. काही वेळा दुबार पेरणीसारखे संकट उभे राहते. पीकं हाती येईपर्यंत शेतकर्‍यांची फक्त गुंतवणूकच सुरू असते. मान्सून लांबल्याने शेतकरी आणि संबंधित घटकांना मोठा आर्थिक फटका बसतो.
डी. एच. उलेमाले, कृषी अर्थशास्त्रतज्ज्ञ
शेतकरी सापडले आहेत द्विधा मन:स्थितीत
४पावसाअभावी हंगाम गेल्याने बहुतेक शेतकरी बियाणे खरेदी करताना द्विधा मन:स्थितीत दिसत आहेत. त्यामुळे इतर पिके सोडून शेतकरी कपाशीकडे अधिक वळत आहेत. सुरुवातीच्या पावसानंतर खते आणि बीज खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. आता मान्सून दाखल होण्याची वाट पाहावी लागत आहे. त्यावरच आमचाही रोजगार अवलंबून आहे.
आश्विन पुन्शी, कृषी केंद्रचालक
आता फक्त पावसाचीच प्रतीक्षा
४वेळेवर पाऊस नसल्याने पेरणी कशी करायची? महागडे बियाणे मातीत टाकण्याची हिम्मत साधारण शेतकरी करत नाही. पावसानं जर अशीच दांडी मारली तर काय करणार? त्यात महागाईनं कंबरडं मोडलं. आता फक्त पावसाचीच प्रतीक्षा आहे.
काशीराम खुले, शेतकरी
तीन जुलैनंतर मान्सूनचा अंदाज
तीन जुलैनंतर विदर्भात मान्सून सक्रिय होऊ शकतो. शुक्रवार आणि शनिवारी (दि. 27, 28) ढगाळ वातावरण राहू शकते. सध्या तापमानाची सरासरी 38-39 अंश सेल्सिअस आहे; तो दोन ते तीन डिग्री वाढण्याची शक्यता आहे.
प्रा. अनिल बंड, कृषी हवामानशास्त्र विभागप्रमुख