आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसाधनगृहाचा मुद्दा आता शहर अभियंत्यांच्या कक्षेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बाजारहाट चीजवस्तूंच्या खरेदीनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांची कुचंबणा थांबवण्यासाठी शहराच्या प्रत्येक वॉर्डात महिला प्रसाधनगृह तयार केले जाणार असून, त्यासंबंधीची फाइल आता मनपा शहर अभियंत्यांच्या कक्षेत आली आहे.


'पराकोटीचा संकोच' या शीर्षकाखाली 'दवि्य मराठी'ने अलीकडेच हा विषय मांडला होता. त्यानंतर मनपाने शहरातील स्वयंसेवी संस्थेची साथ घेऊन तो तडीस नेण्याचा कृती कार्यक्रम आखला. दरम्यान, या कामासाठी आवश्यक मनपा स्तरावरील मुख्य समिती आणि झोनस्तरावरील उपसमित्यांचे गठनही पूर्ण झाले आहे.
शहराची वाढती लोकसंख्या त्यातील महिलांचे प्रमाण लक्षात घेता, येथे महिला प्रसाधनगृहांची संख्या अत्यंत तोकडी आहे. परिणामी, शहरात वावरताना महिलांची मोठी कुचंबणा होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांनी बांधकाम, नगररचना आरोग्य विभागाची संयुक्त बैठक बोलावून त्यात कालबद्ध कार्यक्रमाची मांडणी केली. प्रत्येक वॉर्डात प्रसाधनगृह तयार करता येईल, यासाठी पुरेशी जागा शोधण्याचे निर्देशही याच बैठकीत देण्यात आले होते.
दरम्यान, प्रसाधनगृहांच्या बांधणीसाठी मनपाने शहर स्तरावरील समितीसह झोन स्तरावरील इतर पाच उपसमित्यांची रचनाही निश्चित केली आहे. एनजीओच्या प्रतिनिधी म्हणून डॉ. मोहना कुळकर्णी यांचा समावेश आहे, तर झोन स्तरावरील उपसमित्यांमध्ये त्या-त्या झोनमधील सर्व महिला नगरसेवकांचा समावेश असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या सर्व समित्या प्रशासनामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

१८ परिसरांचा पहिला टप्पा
पहिल्याटप्प्यात १८ जागी प्रसाधनगृहे प्रस्तावीत असून, त्यामध्ये नवसारी बसस्टॉप, राजकमल-अंबादेवी रस्ता, पंचवटी चौक, शेगाव चौक, बायपासवरील स्टॉप, जिल्हाधिकारी कार्यालय-महापौर बंगला रस्ता, गांधी चौक-इतवारा रस्ता, यशोदानगर, राजापेठ-दसरा मैदान रस्ता, बडनेरा येथील मोदी हॉस्पिटल आदी जागांचा समावेश आहे. यासाठी पर्याप्त जागेचा शोध घेतला जात आहे.
केवळ समित्या-उपसमित्यांचे गठन किंवा जागेचा शोध घ्यायला लावून जमणार नाही. प्रत्यक्ष स्ट्रक्चर उभे राहणे गरजेचे आहे. शिवाय तेथील पाणीपुरवठा, घाण पाण्याचा निचरा या बाबीही पूर्णत्वास न्याव्या लागतील. त्यासाठी एनजीओंची मदत हे ओघानेच आले.
डॉ.मोहना कुळकर्णी, मनपा स्तरावरील समितीच्या सदस्य.
महिला प्रसाधनच्या उभारणीबाबत स्थापन झालेली समिती उपसमिती आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाच्या वतीने आवश्यकती कारवाई केली जाईल. शहर अभियंता कार्यालयाने ही फाइल किती पुढे नेली, याचाही आढावा घेतला जाईल.
विनायक औगड, प्रभारी मनपा आयुक्त, अमरावती.