आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambitious Dalit Leaders Set Up Separate Store Ramvilas Paswan

अतिमहत्त्वाकांक्षेमुळे दलित नेत्यांनी स्वतंत्र दुकाने थाटली - केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दलित सेनेच्या वतीने नागपुरात आयोजित राज्यव्यापी मेळाव्यात मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री रामविलास पासवान.
नागपूर - दलित नेत्यांच्या राजकीय अतिमहत्त्वाकांक्षेमुळे महाराष्ट्रात भारतीय रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) वाताहत झाली. आज आरपीआयच्या प्रत्येक नेत्याने स्वत:च्या नावाने वेगवेगळे दुकान (पक्ष) थाटले आहे, अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री आणि दलित नेते रामविलास पासवान यांनी केली आहे. लोक जनशक्ती पार्टीच्या विदर्भ प्रदेश कार्यकर्ता मेळाव्यासाठी ते शनिवारी नागपुरात आले होते. मेळाव्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत पासवान यांनी ही टीका केली.

ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील दलितांना न्याय मिळवून दिला. आंबेडकर जिवंत असेपर्यंत रिपब्लिकन पक्ष सुरळीत सुरू होता; परंतु डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण होताच दलित नेते अतिमहत्त्वाकांक्षी झाले. सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी आंबेडकरी चळवळीला हरताळ फासला आणि स्वत:च्या नावाने वेगवेगळे पक्ष स्थापन केले.
महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आदी नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी दलित समाजाला वापरले. आज महाराष्ट्रातील आरपीआय नेत्यांवर ते दलितांचे नेते असल्याचा ठपका लागला असल्याने त्यांना दुस-या जाती-धर्माचे लोक स्वीकारत नाहीत. यासाठी महाराष्ट्रातील आरपीआय नेतेच जबाबदार आहेत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी या
वेळी केली.

स्वस्त धान्य प्रक्रिया ऑनलाइन होणार
स्वस्त धान्य वितरण प्रणाली ऑनलाइन करण्यात येत आहे. सर्व राज्यांना तसे निर्देश दिले असून मे २०१५ पर्यंत ही प्रणाली ऑनलाइन करण्याचे सर्व राज्यांना आश्वासन दिले आहे. नक्षलग्रस्त छत्तीसगड राज्य स्वस्त धान्य वितरण प्रणालीत अतिशय पारदर्शक असल्याची माहितीही पासवान यांनी या वेळी दिली.

धान्य पुरवठादारांना वेतन देण्याचा प्रस्ताव
स्वस्त धान्य वितरण प्रणालीत पुरवठादार व रेशन दुकानदार महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना शासनाकडून मानधन मिळत नसल्याने ते काळाबाजार करतात. हा काळाबाजार रोखण्यासाठी त्यांना ८ ते १० हजार मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच रेशन दुकानदारांना किराणा सामान विकण्याची परवानगी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

वाहतूक व्यवस्थेचे अत्याधुनिकीकरण
धान्याची वाहतूक करतेवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे धान्य वाहतुकीसाठी खासगी कंपनीच्या ‘सायलो’ व्यवस्थेचा वापर करण्यात येईल. त्यामुळे कोणतेही धान्य खराब होणार नाही किंवा वाया जाणार नाही, अशी माहितीही पासवान यांनी या वेळी दिली.