आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात चार वर्षांत 196 जणांना मिळाली नवी दृष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - भूतलावर अस्तित्वात असलेली सृष्टी अत्यंत सुंदर आहे. डोळस असलेले आपण सृष्टीचे नित्यनूतन सौंदर्य अनुभवतो. मात्र, ज्या व्यक्तींना जन्मत:च दृष्टी नाही, ज्यांना अंधत्व मिळाले आहे, त्यांच्यासाठी जग अंधकारमय आहे. त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर सारण्यासाठी मागील चार वर्षांत शहरातील तब्बल 98 जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. त्यांच्या माध्यमातून तब्बल 196 व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली.

नेत्रदान आणि रक्तदान जगातील सर्वर्शेष्ठ दान आहेत. कारण रक्तदानाने आपण नवीन जीवन देऊ शकतो, तर नेत्रदानाने दृष्टिहिनांच्या जीवनात खर्‍या अर्थाने प्रकाश येतो. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मानवाला या बाबी विकत मिळू शकणार नाहीत. ज्या व्यक्तीला दृष्टी नाही, तिला सृष्टी अनुभवताच येणार नाही. मात्र, अचानकपणे दृष्टी मिळाली, तर तिच्या आयुष्यात यापेक्षा अधिक आनंदाचा दुसरा क्षण कोणताही असणार नाही. दिवसेंदिवस नागरिकांमध्येही नेत्रदानाबाबत जागरूकता वाढली आहे. त्यामुळे नेत्रदान करणार्‍यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

शहरात बुब्बुळ प्रत्यारोपणाची व्यवस्था नाही : नेत्रदान करणार्‍या व्यक्तीचे डोळे काढल्यानंतर ते साठवून ठेवणे किंवा दुसर्‍या व्यक्तीला डोळे बसवण्यासाठी म्हणजेच बुब्बुळ प्रत्यारोपण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा आपल्या शहरात नाही. त्यामुळे बुब्बुळ ताब्यात घेतल्यानंतर ते तत्काळ नागपूरला न्यावे लागते. शहरात बुब्बुळ प्रत्यारोपणाची व्यवस्था झाली, तर शहरवासीयांची सोय होईल.

मृत्यूनंतर सहा तासांच्या आत प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक : नेत्रदानास इच्छुक व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी किंवा साक्षीदारांनी तत्काळ ही माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नेत्र विभागाला द्यावी. त्यानंतर एक सर्जन आपली चमू घेऊन मृत व्यक्तीचे डोळे काढतील. त्यापूर्वी नातेवाइकांनी मृतकाच्या डोळ्यांवर थंड पाण्याचे कापड ठेवावे. ही संपूर्ण प्रक्रिया सहा तासांच्या आत व्हायला पाहिजे. संसर्गजन्य आजार, एड्स, टी.बी., काविळ असे आजार असलेल्या रुग्णांचे डोळे नेत्रदानासाठी योग्य राहत नाहीत, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. चंदन जयस्वाल यांनी सांगितले.


नेत्रदानाची प्रक्रिया काय?
नेत्रदान करण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभाग किंवा आता नव्यानेच सुरू झालेल्या हरिना नेत्रदान समितीकडे जाऊन नेत्रदान करण्यासंदर्भात अर्ज भरून द्यायचा. अर्ज दिल्यानंतर अर्जदाराला कार्ड देण्यात येते. अर्ज सादर करताना दोन साक्षीदार आणि संपर्काचा पत्ता देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेनंतर संबंधित यंत्रणेकडून अर्जदाराला कार्ड वितरित करण्यात येते.