आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरातून धावतात 80 लक्झरी, प्रवासी सुरक्षेकडे खासगी बसमालकांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती-नागपूर महामार्गावरील तळेगाव श्यामजीपंत येथे गुरुवारी पहाटे धावत्या खासगी ट्रॅव्हल्सने पेट घेऊन झालेल्या अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला. यामुळे शहरातून धावणार्‍या तब्बल 80 खासगी ट्रॅव्हल्समधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बसेसमधील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
हजारो प्रवाशांची ने-आण करणार्‍या काही गाड्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांना हरताळ फासण्यात येते, असा क्षेत्रातील तज्ज्ञांना आक्षेप आहे. व्यावसायिक कारणांमुळे अंतर्गत सुरक्षेची देखभाल होत नाही. झपाट्याने विस्तारलेल्या खासगी वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे त्याचे सुव्यवस्थित नियमन होत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. आरटीओचे दुर्लक्षही गंभीर आहे. आरटीओच्या मते, शहरातून धावणार्‍या सर्वच 80 बसेस या वातानुकूलित आहेत. मात्र, वास्तव वेगळेच आहे. ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या मते, काही गाड्यांना नॉन एसी (वातानुकूलित यंत्रणा नाही) धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. सत्य काय, ते अभ्यासाअंतीच स्पष्ट होऊ शकेल.
नियम काय सांगतो?
- स्लीपर कोच बस ही एसीच असावी.
- खासगी बसचे फिटनेस प्रमाणपत्र देण्यापूर्वी बस नवीन असताना दोन वर्षांनी आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी आरटीओ अधिकार्‍याने त्याची तपासणी करावी.
- प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये अग्निशमन यंत्रणा असावी.
- प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग किं वा खिडकी असावी. गाडी सुटण्यापूर्वी याची माहिती प्रवाशांना देण्यात यावी.
- गाडीतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी.
- गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नसावेत.

प्रत्येक बसची सुरक्षा तपासणी
जिल्ह्यातील 80 स्लीपर खासगी बसची नोंदणी आहे. स्लीपर असलेल्या सर्वच बस वातानुकूलित असतातच. यामध्ये स्लीपर आणि एसी अशी वेगळी नोंदणी किंवा परवाना नसतो. तसेच आम्ही दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट देण्यापूर्वी प्रत्येक बसची तपासणी करतो. सुरक्षेसाठी लागणार्‍या सर्व सुविधा त्या बसमध्ये उपलब्ध आहेत किंवा नाही, याची तपासणी याच वेळी करण्यात येते. श्रीपाद वाडेकर, आरटीओ.

घेतली जाते सुरक्षेची खबरदारी
अमरावतीतून धावणार्‍या एसी आणि नॉन एसी स्लीपर अशा दोन्ही प्रकारच्या बस आहेत. आरटीओने काही वाहनांना नॉन एसी परवाना दिलेला आहे. आम्ही सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी बसमध्ये घेतो. मेहराज खान पठाण, अध्यक्ष, अमरावती ट्रॅव्हल्स मल्टिपरपज असो.
या नियमांकडे डोळेझाक
0शहरातून धावणारी प्रत्येक स्लीपर ही एसी कोच नाही.
0नवीन बसला फिटनेस प्रमाणपत्र देण्यापूर्वी जर गाड्यांची तपासणी केली जात असेल, तर प्रत्येक स्लीपर कोचला एसी का नाही?
0प्रत्येक ट्रॅव्हल्समध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा दर्शनी भागात दिसून येत नाही.
0अनेक गाड्यांमध्ये संकटकालीन मार्ग दिसून येत नाही. असला तरी याची माहिती प्रवाशांना दिली जात नाही.
0काही गाड्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेल्याचे दिसून येतात.