आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: राष्ट्रवादीशी घ्या फारकत, काँग्रेस चिंतन बैठकीत पक्ष पदाधिकार्‍यांचा सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारासाठी एकनिष्ठा व प्रामाणिकपणे काम करूनही राष्ट्रवादी काँग्रेस साशंकता व्यक्त करत आहे. उमेदवार जिंकून आणण्यासाठी कल लावूनही टोमणे ऐकावे लागत असल्याची खंत काँग्रेसच्या चिंतन बैठकीत गुरुवारी पक्ष पदाधिकार्‍यांमार्फत व्यक्त करण्यात आली.
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 29) चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पराभवाची कारणे शोधून भविष्यात चुका टाळाव्या लागणार आहेत. अशातच राकाँकडून पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडण्यात येत असल्याने राकाँपासून फारकत घेण्याची वेळ आली आहे. आगामी विधानसभेच्या आखाड्यात स्वबळावरच सर्व जागा लढवा, तसा संदेश वरिष्ठांपर्यंत पोहोचवा, अशी मागणी पदाधिकार्‍यांमार्फत करण्यात आली, असे नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीचा खरपूस समाचार बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, लोकसभेत सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांवरही पक्षाला छाप सोडता न आल्याने पानिपत झाले. पक्ष बळकटीकरणासाटी सर्वांनी जोमाने काम करा, असा सल्ला नेतृत्वाने दिला. बैठकीला जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब वानखडे, विलास पाटील मार्डिकर, भागवत खांडे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.
फाटाफुटीचे राजकारण सोडा
पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर न आणता, सर्वांनी काम करण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे गरजेचे आहे. पक्ष मजबुतीकडे लक्ष केंद्रित करून पक्ष कसा वाढेल, याकडे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असा समजुतीचा सल्ला वरिष्ठांनी बैठकीत दिला.