आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आता ओझं जड होतंय..’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - एकविसाव्या शतकात सार्‍याच क्षेत्रात आमूलाग्र बदल होत असताना आणि माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्यात जग प्रगतीची नवी शिखरे गाठत असताना रिक्षाचालक आजही रिक्षाच ओढत आहेत. सायकल रिक्षाचालक स्वत: या व्यवसायास कंटाळले आहेत; मात्र पोटाची कोर त्यांना तसे करू देत नाही. ऊन असो की वारा, त्यांचं जीवनचक्र नेहमी सारखंच असतं. माणसांना रिक्षात बसवून त्यांना ओढत न्यावेच लागते. म्हणूनच संवेदनशील व्यक्ती चढ आला असता हमखास खाली उतरल्याशिवाय राहत नाही. प्रशासन, सामाजिक संघटना, बँकांनी पुढाकार घेऊन रिक्षाचालकांना या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून ठाम पावले टाकल्यास समस्येतून तोडगा काढणे सहज शक्य आहे. गरज आहे फक्त प्रामाणिक प्रयत्नांची..सकारात्मक मानसिकतेची..


‘आमचा कोणी वाली नाही राज्या.. पायटी दहाले मालकाची रिक्षा घेऊन निंगालो का, संध्याकाई सात वाजेलोक भेटल त्या भाड्यात लोक न्याचे न् पोट भराचं. नाई आरटीओची पासिंग, ना लोन. आमाले दुकान टाकासाटी, याटोसाटी सरकारनं लोन द्याव.’ अशी भावनिक अपेक्षा सायकलरिक्षाचालकांनी ‘दिव्य मराठी’जवळ व्यक्त केली.

अनेक चालक 25 ते 30 वर्षांपासून सायकलरिक्षा चालवून पोट भरतात. 1800 ते 2000 रुपये त्यांची महिन्याची कमाई आहे. शहरात रिक्षांची संख्या सुमारे 1500 आहे. दुसरा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, पण भांडवल नाही. सरकारी कर्ज नाही. मुलांनी रिक्षाचालक होऊच नये, शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय करावा, ही इच्छा. पण, मुलांच्या शिक्षणासाठी, घरातील लग्न-कार्यासाठी पैसा कुठून आणावा, असे अनेक अनुत्तर करणारे प्रश्न त्यांच्या प्रगतीच्या मार्गाचे काटे बनतात.

नागपूरहून होते आयात
सायकलरिक्षाची अधिकृत निर्मिती अमरावतीत होत नाही. पठाण चौकात राहणारे सादिकभाई सुटे भाग एकत्रित बोलवून रिक्षा तयार करतात. एक सायकलरिक्षा जवळपास 12 हजारांत बनते. एकाचवेळी जास्त रिक्षा हव्या असतील, तर नागपुरातील कारखान्यातून आयात केली जाते. अमरावतीच्या तुलनेत नागपुरातील रिक्षा दोन हजारांनी स्वस्त पडते.

कवडीमोल भावाने विक्री
जुन्या रिक्षास योग्य पुनर्विक्री मिळत नसल्याने बहुतेक चालक स्वत:ची रिक्षा न वापरता भाड्याच्या रिक्षानेच संसाराचा गाडा पुढे रेटतात.

500 रिक्षा बिगरनोंदणीच्या
‘एक व्यक्ती, एक सायकलरिक्षा’ असा जनवाहन नोंदणीचा नियम आहे. शहरातील 500 च्या घरातील सायकलरिक्षांची नोंदणीच नाही. काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे 20 ते 30 सायकलरिक्षा बाळगून बाजार मांडलाय. राजापेठ, साबणपुरा, गांधी चौक भागात सायकलरिक्षा गरजूंना भाड्याने दिली जातात.

केव्हा संपणार त्यांच्या वेदना

पाठदुखी, कंबरदुखी डोकंवर काढते
स्वत: सायकलरिक्षा घ्यायची, तर 12 ते 15 हजार कुठून आणणार? त्यामुळे भाड्याची रिक्षा चालवून पोट भरावे लागते. एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रवासी बसायला तयार नसतात. इतकं ओझंही सोसवत नाही. पाठदुखी, कंबरदुखी डोकं वर काढते. बदलत्या परिस्थितीत ‘रिक्षा बंद होईल,’ अशी भीती आहे. राजू चारथाळ, राजापेठ

अशा महागाईत घर कसे चालणार?
प्रवाशाला 20 रुपये भाडे सांगितले, तर तो ऑटोरिक्षाकडे वळतो. त्यामुळे देईल त्या भाड्यात समाधान मानावे लागते. इतक्या महागाईत 70 रुपयांत घर कसे चालणार? चार मुली आहेत, त्यांचे लग्न आणि शिक्षण कसे करणार? पूर्वी आरटीओकडून पासिंग नंबर मिळत असे; पण आता कुणीच वाली नाही. रिक्षा सोडून किराणा दुकान टाकायचा विचार आहे. पण पैसे आणायचे कुठून ?’’ सुनील दुर्योधन, महाजनपुरा

मुलं या धंद्यात यायला तयार नाहीत
घरच्या परिस्थितीमुळे 20 वर्षांपूर्वी वडिलांचा व्यवसाय स्वीकारला. कष्टं पाहून मुलं या धंद्यात यायला तयार नाहीत. त्यांनीही रिक्षाच चालवावी, असे मलाही वाटत नाही; पण 3 मुलांच्या शाळेचा सध्याचाच खर्च झेपवत नाही. मुलांचे भविष्य कसे असणार, काहीच सांगता येत नाही. संजय गडलिंग, राजकमल चौक

मुलांचे लग्न, शिक्षण कसे होणार?
शहरात केवळ 20 ऑटोरिक्षा होत्या तेव्हापासून मी सायकल रिक्षाचालक आहे. महिन्याला दोन हजारांच्या जवळपास कमाई होते. अशा स्थितीत मुलांना शिक्षण घेता आले नाही. कमाईला हातभार लागावा यासाठी मुलगाही हातमजुरी करतो. दुसरा व्यवसाय करण्याचा खूप प्रयत्न केला; पण पैशांशिवाय काही भागत नाही. सरकारनेच काहीतरी योजना काढून व्यवसायासाठी मदत करावी.’’
अशोक रंगारी, सुकळी

पोलिस खात्याकडे नोंदच नाही
शहरात जवळपास 500 सायकलरिक्षा आहेत. मात्र, नोंदणी करणारे जनवाहन कार्यालय नाही. पोलिस विभागाच्या वाहतूक शाखेसोबत ते संलग्न असावे लागते. अमितेश कुमार पोलिस आयुक्त असताना ते सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. 2009 पासून ते बंद आहे.

अर्थसाहाय्याने मिळेल रोजगार
सायकलरिक्षाचालक कमी झाले. 50 ते 65 वयोगटातील रिक्षाचालकांना शासकीय योजनेतून अन्य व्यवसाय सुरू करून द्यायला हवा. अर्थसाहाय्य केले, तर सायकल रिक्षाचालकांना रोजगार मिळेल आणि माणसाने माणसाला ओढण्याचे चित्र दिसणार नाही. गोपाल भेरडे, सायकलरिक्षा युनियन, राजापेठ

तपासणी करू
सायकलरिक्षाचालकांना दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज पाहिजे असेल, तर बँकेच्या कर्जयोजनेत त्यांना समाविष्ट करता येते का, हे तपासावे लागेल. कर्ज प्रकरण तपासल्याशिवाय सांगता येणार नाही. टी. एम. सॅबेस्टियन, सहायक महाप्रबंधक, स्टेट बँक

मदतीस तयार
रिक्षाचालकांना अन्य रोजगार मिळवून देण्याकरिता आम्ही मदत करू. व्यावसायिक प्रशिक्षण देता येईल. उद्योगांमध्ये कामगारांची कमतरता आहे. अशा ठिकाणी आम्ही पुढाकार घेऊन पुनर्वसनासाठी मदतीस तयार आहोत. नीता कक्कड, अध्यक्ष, रोटरी क्लब मिडटाउन