आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीच्या सौंदर्यात भर : गर्ल्स हायस्कूल चौकात साकारणार ‘फाउंटन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गर्ल्स हायस्कूल चौकाच्या सौंदर्यीकरणाला मान्यता मिळाली आहे. महापालिकेला प्राप्त 50 लाखांच्या निधीतून तेथे लवकरच कारंज्याची निर्मिती आणि रस्त्यांच्या दुभाजकांचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. चौकाच्या मध्यभागी कारंजे निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
चौकातील कारंजे गोलाकार आकाराचे राहील. सोबत रात्रीच्या वेळी त्यावर विविधरंगी दिवेदेखील लावले जाणार आहेत. कारंज्यामुळे चौकातील सौंदर्यीकरणात आणखी भर पडणार आहे. चौकात मध्यभागी निर्माण होणार्‍या कारंज्यामुळे तेथील वाहतुकीलादेखील वळण मिळण्यास मदत होईल. शासनाकडून प्राप्त झालेल्या विशेष अनुदानातून हे बांधकाम शहर अभियंता ज्ञानेंद्र मेर्शाम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक अभियंता राजेश आगरकर यांच्या देखरेखीखाली केले जाणार आहे. याच 50 लाख रुपयांमधून नऊ रस्त्यांवरील दुभाजकांचे सौंदर्यीकरणही केले जाणार आहे. या बांधकामाची निविदाप्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.
शहरात मोठय़ा प्रमाणावर विकासकामांना प्रारंभ होणार असून, त्यामुळे शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. साडेबारा कोटी रुपयांच्या विकासकामांसोबतच विविध कामांचा समावेश आहे.
रामपुरी कॅम्पमध्ये ‘डे-केअर’
रामपुरी कॅम्प झोन क्रमांक एकमध्ये डे-केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यतादेखील मिळाली आहे. त्यातील एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे डे-केअर सेंटर बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांधकामासाठी लवकरच निविदाप्रक्रिया राबवली जाणार असल्याचीही माहिती आहे.
शिवटेकडी-भीमटेकडीची निविदा लवकरच
भारतीय पर्यावरण मंत्रालयाकडून शहरातील शिवटेकडी तसेच भीमटेकडीचा विकास केला जाणार आहे. त्यासाठी चार कोटी 57 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी 91 लाख 47 हजार रुपयांचा धनादेश महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे शिवटेकडी आणि भीमटेकडी सौंदर्यीकरण कामाच्या निविदा प्रक्रिया लवकरच आरंभ केली जाणार आहे. निधी प्राप्त झाल्याने या सौंदर्यीकरणाचा कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बांधकाम विभाग रात्रीही सुरूच
शहराच्या विकासासाठी मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे बांधकाम विभागातील अभियंत्यांची धावपळ वाढली आहे. त्यामुळे रात्री आठ, तर कधी नऊपर्यंत बांधकाम विभागाचे कार्यालय सुरू राहते. आगामी काळात मोठय़ा प्रमाणात विकासकामांच्या निविदाप्रक्रिया होणार आहेत. त्या विकासकामांच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया तसेच अन्य कामांसाठी अभियंत्यांना अधिक वेळ द्यावा लागत आहे.