आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिया बुल्स वीज प्रकल्पात कामगारांची प्रचंड तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - माहुली परिसरातील इंडिया बुल्स औष्णिक वीज प्रकल्पातील ब्रदर कंपनीकडे कार्यरत पाचशे ते सहाशे कामगारांना मागील तीन महिन्यांपासून न मिळाल्याने संतप्त कामगारांनी बंडाचा झेंडा फडकावत शुक्रवारी सकाळी प्रचंड तोडफोड केली. कार्यालयाच्या काचा, संगणक, चारचाकी वाहनांवर हल्ला चढवत दगडफेक करण्यात आली. यानंतर प्रकरण चिघळल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात केली आहे.

इंडिया बुल्सची कंत्राटदार कंपनी म्हणून भेल काम सांभाळत आहे. भेल कंपनीच्या अखत्यारित ब्रदर कंपनीचे कामकाज चालते. बॉयलरच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ब्रदर कंपनीने 500 ते 600 कामगारांचे मागील तीन महिन्यांपासूनचे वेतन काढले नाही. ब्रदरच्या वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा कामगारांचा प्रयत्न फसला. ब्रदरमध्ये काम करणारे बहुतांश कामगार परप्रांतीय आहेत. पोळ्याचा सण झाला, तरीही कंपनीने वेतन दिले नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आज सकाळी 8 वाजतापासून काम बंद ठेवले. परिणामी, प्रकल्प बंद होता. याचवेळी कामगारांनी हातात दगड, लोखंडी रॉड, काठय़ा घेऊन भेल, इंडिया बुल्सच्या साइट ऑफिसवर हल्लाबोल करून काचा फोडल्या. बाहेर उभ्या असलेल्या कंपनीतील वरिष्ठांच्या चारचाकी वाहनांचे प्रचंड नुकसान केले. तसेच कार्यालयात असलेले शेकडो संगणक फोडले. तोडफोड सकाळी 8 पासून दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होती. परिस्थिती चिघळल्यामुळे इंडिया बुल्स प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. अपर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी कामगार, इंडिया बुल्स प्रशासन आणि ब्रदर कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली.

प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

इंडिया बुल्समध्ये आर्थिक छळ झाल्यामुळे संतापलेल्या कामगारांची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. प्रकरण दडपण्यासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला. तोडफोडीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची भेट घेण्यासाठी दोन तासांनंतर इंडिया बुल्सचे प्रशासकीय संचालक शरद किनकर मुख्य प्रवेशद्वारावर आले होते.

वेतन मिळेपर्यंत काम करणार नाही
पोटासाठी आम्ही हजारो किलोमीटरवर येतो. मिळेत ते काम करून जीव धोक्यात घालतो; तरीही मागील तीन महिन्यांपासून वेतन नाही. त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले. वेतन मिळेपर्यंत कामबंद कायम राहील. 500 ते 600 कामगारांचा प्रश्न आहे.’’ नितेश (गोरखपूर) आणि सुनील (राजस्थान), कामगार, ब्रदर कंपनी.

यापूर्वीही ब्रदरने असेच केले होते..
इंडिया बुल्स कंपनीची मुख्य कंत्राटदार कंपनी भेल असून, भेलची उपकंत्राटदार ब्रदर कंपनी आहे. आम्ही भेलला नियमित रक्कम देतो. मात्र, तरीही ब्रदरमधील कामगारांचे वेतन होत नाही. त्यांना समज देण्यात आली होती.’’ शरद किनकर, इंडिया बुल्स.