आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati Municipal Corporation Now Grows Its Garden On Wastage Water

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती मनपा नाल्याच्या पाण्यावर फुलणार आता शहरातील उद्याने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावती शहरातून वाहणार्‍या नाल्यातील अशुद्ध पाणी शुद्ध करून उद्यान फुलविण्याच्या दृष्टीने महापालिकेने सकारात्मक पावले उचलली आहेत. त्या दृष्टीने ‘फायटोरिड’ या नव्या प्रकल्पाची पायाभरणी केली जात आहे. येत्या दोन महिन्यांत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

शहरातील सांडपाणी गेल्या अनेक दशकांपासून खुल्या छोट्या नाल्यांद्वारे वाहून आणि मोठय़ा नाल्यामध्ये एकत्रित होऊन पुढे मोठय़ा नदीस मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पाण्याचे शुद्धीकरण केल्यास पिण्याव्यतिरिक्त इतर वापराकरिता एक स्रोत निर्माण होऊ शकतो. याद्वारे वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता हा प्रकल्प उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यासाठी प्रशांतनगरातील उद्यानाशेजारी सध्या काम सुरू झाले आहे. या ठिकाणी एक मोठे टाके बांधण्यात येत आहे. नाल्याचे वाहते पाणी या टाक्यात आणण्यात येईल. या अशुद्ध पाण्यावर फायटोरिड तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया करण्यात येणार आहे.

शुद्धीकरण केलेले पाणी महापालिकेची उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृह, रस्त्याच्या दुभाजकांवर लावण्यात आलेल्या झाडांना; तसेच रस्ते तयार करण्यासाठीदेखील वापरता येऊ शकते. शहराच्या विविध भागांमध्ये आणखी असेच प्रकल्प उभारले जातील.


काय आहे फायटोरिड?
नीरी या संस्थेने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. नैसर्गिक वातावरणात वाढणार्‍या विशिष्ट वनस्पतींच्या मुळांद्वारे सांडपाण्यातील दूषित घटक शोषले जातात आणि पाण्याचे शुद्धीकरण होते. भौतिक, रासायनिक व जैविक प्रक्रियेच्या संयोगातून अशुद्ध अंश बाहेर काढले जातात.

तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे पैलू
* सोपा आणि सहज उपयोगात आणण्याजोगा.

*अत्यंत कमी देखभालीची गरज .

* इको-फ्रेंडली, कॉस्ट इफेक्टिव्ह


असे होते पाणी शुद्ध
नाल्याच्या काठावर 1.10 मी बाय 100 मीटर आकाराचे टाके बांधण्यात आले आहे. त्यात फिल्ट्रेशन स्क्रीनिंग टाकून फायटोरिड प्लँटेशन करण्यात येईल. नाल्यातील पाणी पंपाच्या माध्यमाने उपसण्यात येईल व ते या टाक्यात टाकण्यात येईल. टाक्यात असलेल्या फायटोरिड प्लँटमधून हे पाणी गेल्यास त्यावर जैविक प्रक्रिया होते, त्यानंतर कार्बनिक पदार्थांचे डिकम्पोजिशन होते व पुढच्या टप्प्यात रॉक मीडियाच्या माध्यमाने पाण्याचे शुद्धीकरण केले जाते.