आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती-नागपूर महामार्गावर ट्रकची समोरासमोर धडक; दोन गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिवसा - अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसानजीक भरधाव ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन्ही ट्रकचालक गंभीर जखमी झाले. एका चालकाला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर दुसर्‍याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेख जाबीर शेख नशीर (25, रा. अकोला) व अनवर मन्सुरी (29, रा. उमरेड) अशी त्यांची नावे आहेत. वरखेड फाट्याजवळ सोमवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. अपघातानंतर वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती.

अमरावती-नागपूर महामार्गावरील वरखेड फाट्याजवळ वन-वे सुरू आहे. सकाळी सातच्या सुमारास या मार्गावरून नागपूरहून अमरावतीकडे येणारा ट्रक (एम.एच. 40/ 5199) आणि अमरावतीहून नागपूरकडे जाणारा ट्रक (एम.एच.30 एबी 1152) समोरासमोर धडकले. हा अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही ट्रकचे चालक गंभीर अवस्थेत ट्रकमध्ये फसले होते. या भीषण अपघातामुळे या महामार्गावर वाहनांची लांबलचक रांग लागली होती. पोलिसांनी तासाभरानंतर घटनास्थळ गाठून ट्रकमध्ये फसलेल्या ट्रकचालकांना बाहेर काढले. शेख जाबीर गंभीर असल्याने त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अनवर मन्सुरी याला तिवसा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही ट्रक रस्त्याच्या बाजूला सारल्यानंतर तब्बल दीड तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

तिवसा पोलिस पोहोचले उशिरा
अपघातानंतर तिवसा पोलिस तब्बल एक तास उशिरा घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत वाहनांची लांब रांग लागून वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे उपस्थितांमध्ये नाराजीचा सूर होता.