आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati Wadali And Chatri Lake Development Program

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती : मनपाच्या पुढाकाराने साकारणार शंभर कोटींचा प्रकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील ऐतिहासिक वडाळी व छत्री तलावांच्या बळकटीकरणासोबतच मुख्य 14 नाल्यांवर पूरसंरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याने काठावर राहणार्‍यांची पुरापासून सुटका होईल. तब्बल शंभर कोटी रुपयांचा हा प्रकल्प अमरावतीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

वडाळी व छत्री असे दोन महत्त्वाचे तलाव शहरात आहेत. या तलावांमधील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून काढलेला नाही. पूर्वीच्याच भिंतींच्या जोरावर हे तलाव तग धरून आहेत. भविष्यात या भिंतींद्वारे तलावांना धोका होऊ नये; तसेच नाल्यांना पूरसंरक्षक भिंती बांधून त्या माध्यमाने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रस्ताव मनपाने तयार केला आहे. आयुक्त अरुण डोंगरे यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. नॅशनल लेक कंझव्र्हेशन प्रोग्राम व स्टेट लेक कंझव्र्हेशन प्रोग्राम अंतर्गत ही कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून निधी मिळवण्याचे मनपाचे प्रयत्न राहणार आहेत. या कामाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी मनपाने पुण्याच्या एका खासगी कंपनीला दिली आहे. हा अहवाल तीन महिन्यांत सादर होणार आहे.

अमरावती शहरातील मुख्य 14 नाल्यांची लांबी 65 किलोमीटर आहे. यातील काही नाल्यांच्या पूरसंरक्षक भिंतींचे बळकटीकरण मनपाने केले. परंतु, अद्यापही अनेक ठिकाणचे काम झालेले नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत ती कामे होऊ शकतात. नाल्यामुळे पर्यावरणाला निर्माण झालेला धोका कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा या प्रकल्पाच्या माध्यमाने करण्यात येणार आहे. नाल्यांतील गाळ काढणे व नाले स्वच्छ ठेवण्याचासुद्धा प्रस्तावात समावेश आहे. या योजनेचा प्राथमिक अहवाल दाखल झाला असून आता इस्टिमेट तसेच प्लॅन दाखल होणार आहेत. त्यानंतर हा प्रस्ताव आमसभेत येईल व येथून आयुक्तांच्या मान्यतेने शासनाकडे जाईल. त्यामुळे योजनेला मूर्त स्वरूप येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.