आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषिमंत्री खडसेंविराेधात तीव्र संताप, अात्महत्यांच्या विधानावर अाक्षेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘भाजप - युती सरकार महाराष्ट्रात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या रोखू शकत नाही’, अशी स्पष्ट कबुली देतानाच अादिवासी शेतकरी अात्महत्या करत नाहीत अशा वल्गना करणारे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याविराेधात विदर्भात संतप्त भावना व्यक्त हाेत अाहेत. रविवारी काही संघटनांचे कार्यकर्ते व शेतक-यांनी युती सरकारविराेधात धिक्कार अांदाेलन करत खडसे यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांची होळी करण्यात आली.

भाजप सरकारने शेतक-यांना कर्जमाफी दिली नाही तसेच बँकांनी कर्जाचे पुनर्वसन आजपर्यंत केले नाही. पेरणीची तयारी पैसे नसल्याने खोळंबली आहे. तरीही सरकार मदत करण्यास तयार नाही. अशा वातावरणात कृषिमंत्री खडसे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चाेळत अाहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनाचे संयोजक व शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिली.
विदर्भात मागील दशकात झालेल्या ११ हजारावर आत्महत्यांमध्ये ५० टक्के शेतकरी आदिवासी, दलित व भटक्या जमातीचे शेतकरी अाहेत. बँकांनी कर्ज नाकारल्यामुळे तसेच कृषीमालाला भाव न मिळाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा सरकारी अहवाल असताना खडसे यांनी आदिवासी शेतकरी आत्महत्या करीत नसल्याची खोटी माहिती देत अाहेत, अशी टीका या अांदाेलनात सहभागी झालेल्या आदिवासी शेतकरी विधवांनी केली.

खडसे, अश्रू पुसायला या
डोंगरखरडा येथील आदिवासी शेतकरी मारोती कुलसंगे व त्यांच्या पत्नी स्वरस्वती कुलसंगे यांनी अात्महत्या केल्यावर त्यांची मुले उपासमारीला ताेंड देत अाहेत. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी खडसेंनी यावे, त्यावेळी त्यांना आपण शेकडो आदिवासी शेतकरी विधवांची भेट करून देऊ, असे जाहीर अाव्हान विदर्भ जनआंदोलन समितीचे सचिव मोहन जाधव यांनी दिले.