आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्र्यांच्या ताफ्यावर चंद्रपुरात दगडफेक, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - आठवडाभरापासून पुराच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूरमधील पूरग्रस्तांच्या संयमाचा बांध रविवारी फुटला. संकट सरल्यानंतर पाहणीसाठी आलेले सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या विरोधात संतप्त जमावाने घोषणाबाजी केली. ताफ्यातील पोलिसांच्या वाहनावर दगडफेकही केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.


पालकमंत्री संजय देवतळे यांनी रविवारी पठाणपुरा गेट, विठ्ठल मंदिर वॉर्ड, मिलिंदनगर, हनुमान खिडकी, हवेली गार्डन, सिस्टर कॉलनी, गोपालपुरी, बालाजी वॉर्ड, ठक्कर कॉलनी या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या वेळी सिस्टर कॉलनी भागात संतप्त पूरग्रस्तांनी सरकार तसेच महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शिवीगाळ करून हुज्जत घातली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच 7 ते 8 जणांना ताब्यात घेतले.


10 दिवसांत अहवाल : नुकसानाचा अहवाल दहा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी अमरावतीत दिले.

मेळघाटातील नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करुन परतल्यानंतर पाटील यांनी रविवारी अधिका-यांकडून नुकसानीचा आढावा घेतला. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 45 हजार हेक्टर जमीनीचे नुकसान झाले आहे. 25 हजार हेक्टर जमीनीतील पीक नष्ट झाले. तर सुमारे 20 हजार हेक्टर जमीन खरडून निघाली आहे. मेळघाटातील शेतक-यांना मोफत बियाणे देण्याची घोषणाही विखे पाटील यांनी केली.