आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anjali Damania Detained After Protest By AAP At NCP Office In Nagpur News In Marathi

पवार, मलिकांच्या आदेशानेच ‘आप’ कार्यालयाची तोडफोड - अंजली दमानिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - ‘सिंचन घोटाळ्यात तक्रारी करूनही काहीच झाले नाही. आता ऊर्जा क्षेत्रातील घोटाळा बाहेर काढल्याचा राग आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि नवाब मलिक यांनी कार्यकर्त्यांना आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर पाठवले आणि त्यांच्याच आदेशावरून मुंबईतील आपच्या कार्यालयात तोडफोड केली,’ असा थेट आरोप आम आदमी पक्षाच्या राज्य संयोजिका अंजली दमानिया यांनी रविवारी केला.

वध्र्यामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने अंजली दमानिया यांच्या नेतृत्वात झाडू यात्रा काढण्यात आली. शिवाजी चौकातून सुरू झालेल्या झाडू यात्रेचा समारोप बजाज चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापुढे झाडू मारून झाला. या वेळी दमानिया म्हणाल्या की, आम्ही केवळ झाडू मारून निषेध नोंदवला. पण आठ फुटांचे होर्डिंग्ज जाळणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार, नवाब मलिक यांच्या परवानगीशिवाय 25 ते 30 कार्यकर्ते येऊच शकत नाहीत आणि कार्यकर्ते स्वत:च्या मनाने काम करू शकत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

मुलांना सोडले म्हणजे नशीब
आता माझ्यावरही आरोप केले जात आहेत. माझ्या पतीवरही आरोप करण्यात येत असून, सासर्‍यांचेही नाव घेतले जात आहे. हे होणारच आहे. माझ्या मुलांना यातून सोडले म्हणजे नशीब, असे अंजली दमानिया म्हणाल्या.

घोटाळ्याचे सूत्रधार पवारच
वीज कंपनीतील 22 हजार कोटींच्या घोटाळ्याचे सूत्रधार ऊर्जामंत्री अजित पवारच असून, सोमवारी मुंबईत कागदपत्रांसह घोटाळ्याचा पर्दाफाश करणार असल्याची घोषणा अंजली दमानिया यांनी नागपुरात केली. ‘आम आदमी पार्टीने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी आरोप केले होते. शनिवारी नागपुरात सहा कोल वॉशरीजसंदर्भात झालेल्या तक्रारींमुळे आम्ही केलेल्या आरोपांना पुष्टी मिळत आहे. कोळसा वॉशरीजमध्ये गेलेला कोळसा गायब व्हायचा. महानिर्मितीला खराब कोळशाचा पुरवठा व्हायचा. त्यामुळे विजेचे उत्पादन कमी होऊन त्याचा फायदा खासगी वीज कंपन्यांना त्यांच्याकडून महागडी वीज खरेदी करून देता येईल असे यामागील कारस्थान होते,’ असेही दमानिया म्हणाल्या.