आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anjali Damania News In Marathi, AAP, Muttemwar, Gadkari, Divya Marathi

मुत्तेमवार, गडकरी एकाच माळेचे मणी; ‘आप’च्या अंजली दमानिया यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आणि भाजपचे नितीन गडकरी आजवर सोयीचे राजकारण करत आले आहेत. पंधरा वर्षांपासून खासदार असताना मुत्तेमवारांनी नागपूरसाठी काहीही केले नाही. आजवर त्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून लोकांची दिशाभूल केली. मुत्तेमवार आणि गडकरी हे एकाच माळेचे मणी आहेत, अशी टीका ‘आप’च्या अंजली दमानिया यांनी केली आहे.


नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्या बोलत होत्या. मिहानच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी आणि मुत्तेमवार एका मंचावर होते. त्या वेळी देण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये मोठमोठ्या बाता करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात चित्र काय आहे? 15 वर्षांपासून खासदार असूनही मुत्तेमवार यांनी केंद्रात नागपूरसंदर्भात एकही प्रश्न मांडला नाही.


येथील पालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर यांच्या प्रयत्नातून नागपूरचा विकास झाला आहे. नागपूरच्या विकासावर गडकरी आणि मुत्तेमवार एकमेकांची प्रशंसा करतात आणि स्वत:ची पाट थोपटून घेत आहेत. हे दोन्ही नेते ‘तुम्ही पण छान अन् आम्ही पण छान’ या उक्तीप्रमाणे स्वत:च्या सोयीचं राजकारण करीत आले, असा आरोप दमानिया यांनी या वेळी केला.


शक्तिप्रदर्शन कशाला?
निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस, भाजपवाले हजारो लोकांचा जमाव घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात येतात. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ पाच लोकांची गरज असते. मग असे शक्तिप्रदर्शन कशासाठी, असा सवाल करत दमानिया यांनी भाजप आणि काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनामुळे प्रशासनाची गैरसोय होते. ही विचारधारा बदलायची आहे. देशाच्या राजकारणाचा चेहरा बदलण्यासाठी आपचा जन्म झाला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही पाचच जण आलेलो असून मतदानाच्या दिवशी ‘आप’ची शक्ती दिसेल, असा विश्वास दमानिया यांनी व्यक्त केला.