आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anjali Damania To File FIR Against Gadkari\'s Financer BJP MP Ajay Sancheti

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दमानियांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले, खासदार संचेतींविरोधात पोलिसांत तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भाजपचे खासदार अजय संचेती यांच्या मालकीच्या कंपन्यांमधील कथित भ्रष्टाचारासंदर्भात शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करून आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. ‘आप’ची नागपूर लोकसभेची उमेदवारी मिळताच अंजली दमानिया सोमवारी नागपुरात दाखल झाल्या. त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्त के. के. पाठक यांची भेट घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे तपास पथकाकडे संचेती यांच्या कंपन्यांमधील व्यवहारासंदर्भात तक्रार दाखल केली.
दमानिया यांनी तक्रारीची माहिती देताना सांगितले की, शक्तीकुमार एम. संचेती आणि एस. एन. ठक्कर या दोन कंपन्यांनी 14 नोव्हेंबर 2005 ला नागपूर आणि मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी संचालक मंडळाची बैठक घेतली. त्याच दिवशी दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळांनी ठराव पारित केला. ठरावानुसार 14 नोव्हेंबर 2005 ला या कंपन्या बंद करण्यात येत असून, त्यांचे पुढील व्यवहार एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर आणि आणखी एका कंपनीच्या नावाने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळाच्या स्वाक्षरीचे सर्वाधिकार खासदार संचेती यांना देण्यात आले होते. मात्र, त्या कंपन्या कधीच बंद झाल्या नाहीत. उलट त्यांच्या नावावर दोन नव्या कंपन्या स्थापन झाल्या. यानंतर वरील चारही कंपन्यांच्या नावाने खासदार संचेती यांनी 2005 ते 2010 दरम्यान सिंचनाचे हजारो कोटींची जवळपास 12 कंत्राटे मिळवली. कंपनी कायद्यानुसार ही शासनाची फसवणूक आहे. याशिवाय बनावट कंपन्यांच्या नावाने सिंचनाचे अनेक कंत्राट मिळवून त्यांनी शासनाची आर्थिक लुबाडणूक केली, असा आरोप दमानिया यांनी केला. पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत तक्रार स्वीकारली. प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्याशिवाय गुन्हा नोंदवण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली. परंतु, पोलिस उपायुक्त कोल्हे यांनी प्रकरणावर पुढील शुक्रवारपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती दमानिया यांनी या वेळी दिली.
अन्यथा मूक आंदोलन
खासदार संचेती यांच्याविरुद्ध ठोस पुरावे दिल्यानंतरही पोलिस एफआयआर नोंदवत नसल्याने दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी पुढील शुक्रवारपर्यंत खासदार संचेतींविरुद्ध गुन्हा न नोंदवल्यास ‘आप’तर्फे पोलिस आयुक्त कार्यालयाबाहेर मूक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दमानिया यांनी या वेळी दिला.