आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी घोटाळ्याचे माझ्याजवळ पुरावे; राजकीय उदासीनतेमुळे दुष्काळ : अण्णा हजारे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- केंद्र सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेत अफरातफर झाल्याचे पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी केला. हवे असल्यास राज्य सरकारला हे पुरावे देण्यास आपण तयार असल्याचेही अण्णा म्हणाले. मात्र, पुराव्यांचा खुलासा त्यांनी केला नाही.

केंद्र सरकारच्या सुमारे 52 हजार कोटींच्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत भारताच्या नियंत्रक व महालेखाधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालात गरजूंऐवजी अपात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचे म्हटले आहे. नोंदींमध्ये फेरफार करून हजारो कोटींच्या या योजनेत अफरातफरी होत असताना अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे अहवालात नमूद आहे.

राज्यातील दुष्काळ मानवनिर्मित आहे. राजकीय उदासीनता व भ्रष्टाचारामुळे जलस्रोतांचे नियोजन झाले नाही. त्यामुळे दुष्काळ पडला, असा आरोप अण्णांनी केला. जल व मृदसंधारणाच्या शास्त्रीय पद्धतीचा विचार न करता पाण्याची उधळपट्टी होत असल्यानेही परिस्थिती उद्भवल्याचे अण्णा म्हणाले.

राहुल, मोदी देशाचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत- राहुल गांधी असोत वा नरेंद्र मोदी. दोघेही या देशाचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये लोकायुक्त नेमण्यास केलेल्या विरोधाबद्दल त्यांनी मोदींवर टीका केली. गुजरातमध्ये लोकायुक्तांच्या नेमणुकीला मोदी सरकारने दिलेले आव्हान सुप्रीम कोर्टाने फेटाळले होते.