आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार मुक्तीसाठी अंतिम क्षणापर्यंत लढाई : अण्णा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावराजा - ‘निवडणुकीत दारू, ढाबा पार्टी आणि नोट मिळाली की आम्ही भगतसिंग, राजगुरूंसारख्या देशभक्तांच्या बलिदानाची किंमत विसरतो. आज देशाला भ्रष्टाचारी नेत्यांनी पोखरले आहे. भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण परिवर्तनाची लढाई लढणार आहोत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी केले.

बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दराडे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. हजारे म्हणाले की, व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईसाठी आवश्यक असलेले 17 मुद्दे मान्य करणार्‍या उमेदवारास व राजकीय पक्षास आपला पाठिंबा राहणार आहे. राजकीय खुर्चीचा गुणधर्म वाईट आहे. या खुर्चीत बसल्यानंतर सर्वच नेत्यांचा दृष्टिकोन बदलतो. मात्र, खुर्चीत बसल्यानंतर बुद्धीचा पालट होऊ नये म्हणून दराडेंचा राजीनामा आताच घेऊन ठेवला असल्याने त्यांच्या प्रचारासाठी आपण आलो आहोत. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई आणि ग्रामसभेचा कायदा याचसोबत नुकताच मंजूर झालेल्या जनलोकपालाचे फलित येत्या आठ महिन्यांत दिसेल’, असे भाकीतही त्यांनी केले.

सहकाराची सत्ताधारी लोकांनी वाट लावून जनतेचाच पैसा आपसात वाटून घेतला. पतसंस्था, सहकारी बँका यांनी बुडवल्यानेच पतसंस्थांसाठी 200 कोटी रुपये मंजूर करावे लागले. परिवर्तनाच्या लढाईत सहा भ्रष्ट मंत्री व 400 भ्रष्टाचारी अधिकारी घरी गेल्याचे सांगून तरुणांनी या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्य व अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांनीही सहकाराची जिल्ह्यात झालेली दुरवस्था सांगून परिवर्तनाच्या लढाईत आपण सहभागी झालो आहोत, असे स्पष्ट केले.

शेतकर्‍यांसाठी लढा देणार
देशभर शेतकर्‍यांचे संघटन करून शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि 70 वर्षांवरील शेतकर्‍यांना पेन्शन लागू करण्याची लढाई आपण सुरू करत आहोत. वेळ आली तर रस्त्यावर नव्हे, तर जेलमध्ये जाण्यास आपण माझ्यासोबत तयार आहात का, असा प्रतिप्रश्न अण्णांनी उपस्थितांना केला.


‘आप’ने माझ्या नावाचा वापर करू नये : हजारे
‘आम आदमी पार्टीने माझ्या नावाचा वापर करू नये’, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी देऊळगाव राजा येथील पत्रकार परिषदेत केले. तसेच राज्यातील सहकार क्षेत्रही डबघाईस आले असून सहकार मंत्र्यांना खुर्चीत बसण्याचा अधिकार राहिला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी अण्णा हजारे यांनी अपक्ष उमेदवार बाळासाहेब दराडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारार्थ अण्णा शनिवारी देऊळगावात आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात पूर्वी स्थापन करण्यात आलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समित्यांबाबत त्यांना विचारणा केली असता, या सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्याचे ते म्हणाले.

‘चारित्र्य, शुद्ध आचार विचार असणार्‍या पंतप्रधानांची देशाला आज खर्‍या अर्थाने गरज आहे. डॉ. मनमोहन सिंग व्यक्तिगत स्तरावर चांगले व्यक्तिमत्त्व असले तरी रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या पंतप्रधानाची देशाला आवश्यकता नाही,’ असेही अण्णांनी या वेळी सांगितले. देशातील सहा अपक्षांना आपण पाठिंबा दिला आहे. ते निवडून आल्यास नरेंद्र मोदींना पाठिंबा देणार नसल्याचेही अण्णांनी स्पष्ट केले.