आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Black Magic Bill Finally Presented In Legislative Assembly, Opposition Opposed It

जादूटोणा प्रतिबंधक विधेयक अखेर विधानसभेत सादर, विरोधकांचा कडाडून विरोध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जवळपास 18 वर्षांपासून प्रलंबित असलेले जादूटोणा प्रतिबंधक विधेयक अखेर बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आले. त्यावरील चर्चेच्या वेळी विरोधकांनी त्यातील तरतुदींना कडाडून विरोध केला, तर सत्ताधारी आमदारांकडून कायदा किती आवश्यक आहे त्याची भलावण करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चर्चा झालेल्या या विधेयकावर गुरुवारीही चर्चा सुरूच राहणार आहे.
अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जादूटोणा प्रतिबंधक कायदा तत्काळ करावा, अशी मागणी जोर धरत होती. यासंदर्भात काढलेल्या वटहुकूमाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सरकारने विधेयक विधिमंडळात मांडले. सायंकाळी 5 वाजता त्यावर चर्चा सुरू झाली. भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाजाला अश्रद्ध करणारे कायदे रेटून करू नका. लोकसहभागातून कायदे करा. आम्ही पुरोगामी आहोत म्हणून कुणीतरी प्रतिगामी आहोत हे दाखवण्याची भूमिका घेऊन असा कायदा आणला जात आहे. भयानक गुन्ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यासाठी आहे त्या कायद्याचा वापर करून कठोर शिक्षा होऊ शकत असताना काहीच नवे नसलेला कायदा करण्यात अर्थ नाही. पुरोगामी वारकरी संप्रदायाला वाटणा-या शंकांचे निरसन करायला हवे, असे फडणवीस यांनी ठासून सांगितले. कायदा कितीही चांगला केला तरी त्याचा दुरुपयोग होतो हे सांगून ते म्हणाले की, गरिबांना, अज्ञानी जनतेला नाडणा-या भोंदूंना चाप लावणारा कायदा करायला हवा होता.
बारा तरतूदी आधीच आहेत : देसाई
शिवसेनेचे गटनेते सुभाष देसाई म्हणाले की, विधेयकातील बारा तरतुदी अशा आहेत ज्या भारतीय दंड संहिता आणि इतर कायद्यांतही आहेत. मग हा कायदा कशासाठी करत आहात हे सरकारने सांगावे. त्यातील काही तरतुदी एवढ्या कठोर आहेत की हा कायदा करून नव्या अ‍ॅट्रॉसिटीला तर जन्म देत नाही ना अशी भीती वाटते. अंधश्रद्धेला बळी पडलेली व्यक्ती, त्याच्या जवळची व्यक्ती आणि इतर कुणी यातील ति-हाइत व्यक्तीची तरतूद भयंकर असून त्यातून अनर्थ होईल असा इशारा त्यांनी दिला. या वेळी अबू आझमी, मीनाक्षी पाटील, आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
मुस्लिम समाजातही बाबांचे प्रस्थ : मलिक
एकाच समाजाला टार्गेट केले जाते असा प्रचार साफ खोटा आहे, असे राष्टÑवादी काँग्रेसचे नवाब मलिक म्हणाले. हिंदूंप्रमाणेच मुस्लिम समाजातही अशा बंगाली बाबा, अमुक-तमुक बाबांचे प्रमाण अधिक आहे. श्रद्धेचा गैरवापर करणा-यांना चाप लावण्यासाठी हा कायदा आहे. दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्यापुरता कायदा करू नका, असे मलिक यांनी म्हटले आहे.
रामदेव बाबांवरून वाद
मलिक यांनी भाषणात बाबांचा उल्लेख करताना आसाराम बापू, नारायण साई, निर्मल बाबा यांच्यासोबतच बाबा रामदेव यांचा उल्लेख केला. त्यावर विरोधक संतापले. रामदेवांचा उल्लेख कामकाजातून काढून टाका, अशी त्यांची मागणी होती. अखेर अध्यक्षांनी हे विधान तपासून निर्णय घेण्याचे सांगितल्यावर चर्चा पुढे सुरू झाली.
कायद्यातील काही तरतुदी
* अंधश्रद्धा पसरवणे, भोळया-भाबड्यांची फसवणूक करणा-यांना सहा महिने ते जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा. किमान 5 ते जास्तीत जास्त 50 हजार दंड.
*भूत उतरवण्याच्या बहाण्याने शारीरिक अत्याचार गुन्हा. (प्रार्थना, मंत्र, जप, पूजा नव्हे.)
*चमत्काराचा प्रयोग करून फसवणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करून घेणे गुन्हा ठरणार.
*जिवाला धोका निर्माण होणे, जीवघेण्या जखमा होतात अशा अघोरी प्रथांचा अवलंब गुन्हा.
*गुप्तधन, जारणमारण करणे, भानामतीच्या नावाखाली अमानुष कृत्य करणे, नरबळी गुन्हा ठरणार.
*कुत्रा, साप, विंचू चावल्यास उपचारापासून रोखत मंत्रतंत्र, गंडेदोरे करणे गुन्हा ठरतो.
*दैवी शक्तीचा दावा करून पूर्वजन्मी पत्नी, प्रेयसी, प्रियकर असल्याचे सांगून लैंगिक संबंध.
*दैवी शक्तीद्वारे मूल होण्याचे आश्वासन देत व्यक्तीचा धंदा, व्यवसायासाठी वापर करणे.
सरकारचा नाइलाज असा
०ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वटहुकुमावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली. तेव्हापासून कायदा लागू.
०सहा महिन्यांत विधिमंडळाची
मान्यता घेण्याचे बंधन सरकारवर आहे. त्यामुळे विधेयक मांडले.