आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुरागचा अचूक लक्ष्यभेद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - 14 वर्षांखालील मुलांच्या जिल्हास्तरीय निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेतील 30 मीटर इव्हेंटमध्ये राज्य व राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा गुरुकुल आर्चरी अकादमीचा धनुर्धर अनुराग बालेकरने 360 पैकी सर्वाधिक 327 गुणांची कमाई करून विजेतेपद पटकावले. एकाग्रता, अचूक लक्ष्यभेद आणि नियमित सरावाच्या आधारे त्याने हे यश संपादन केले.

जिल्हा धनुर्विद्या संघटनेतर्फे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ निवडण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत मुलांच्या गटात अनुराग बालेकरचा बोलबाला राहिला. एकलव्य धनुर्विद्या अकादमी, नांदगावच्या यश भुसेने 312 गुणांसह उपविजेतेपद पटकावले. त्याचाच सहकारी प्रथम शेंडेला 311 गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या गटात तिन्ही स्थानांवर एकलव्य धनुर्विद्या अकादमीच्या खेळाडूंनी ताबा मिळवला. अश्विनी कोल्हेने 360 पैकी 293 गुणांची नोंद करून प्रथम, ज्ञानेश्वरीकडून 278 गुण मिळवून द्वितीय आणि साक्षी तोटेने 250 गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही मुलींमध्ये यश मिळवण्यासाठी चांगलीच चुरस दिसून आली. मात्र अश्विनीने अंतिम काही फेर्‍यांमध्ये अचूक तीर सोडून दोन्ही सहकारी खेळाडूंना मागे टाकले.

न्यू स्वस्तिकनगर, आकोली रोड, सातुर्णा येथील गुरुकुल धनुर्विद्या अकादमीत झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून जिल्हा भाजप अध्यक्ष अन् गुरुकुल आर्चरी अकादमीचे संस्थापक तुषार भारतीय, राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सह-सचिव प्रमोद चांदूरकर, मिशन आॅलिम्पिक्सचे सचिव दीपक आत्राम, सहायक कार्यकारी अभियंता किरण हातगावकर उपस्थित होते. संचालन प्रशिक्षक पवन तांबट यांनी, तर आभार प्रदर्शन अमर जाधव यांनी केले. याप्रसंगी विकास वानखडे, गणेश विश्वकर्मा, प्रफुल्ल डांगे, विलास मारोडकर, समीर म्हस्के, नागराज काकडे, वैभव देशमुख, प्रेम नांदुरकर आदी प्रामुख्याने
उपस्थित होते.

तीर सोडणे सोपे काम नव्हे
प्रत्यंचेला तीर लावून तो लक्ष्याच्या दिशेने सोडताना बघणे मजेदार व सोपे वाटते. मात्र, प्रत्यक्ष धनुष्य हाती घेतल्यानंतर प्रत्यंचा ताणायला किती परिश्रम लागतात, याची प्रचिती सर्व प्रमुख अतिथींना आली. स्पर्धा व सरावादरम्यान धनुर्धराला दिवसातून तीनशे तीर लक्ष्याकडे सोडावे लागतात. त्याच्या हाताची स्थिती कशी राहत असेल, असे विचारही पाहुण्यांनी बोलून दाखवले, काहींना तर प्रत्यंचाही ताणता आली नाही.

30 मी. मध्ये नांदगावच्या धनुर्धरांचे वर्चस्व
30 मी. इव्हेंटमध्ये एकलव्य धनुर्विद्या अकादमीने कमाल केली. अनुराग वगळता मुलींच्या गटातील अव्वल तीन आणि मुलांच्या गटातील दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाचा, असे पाच धनुर्धर नांदगावचे आहेत.