आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन खडसेने पटकावले टेबल टेनिसचे विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - युवा मुलांच्या गटातील रोमांचक अंतिम लढतीत अर्जुन खडसे याने कलात्मक अन् वेगवान खेळाच्या बळावर नीखिल मेश्रामला 11-7, 12-10, 9-11, 8-11, 11-9 ने पराभवाचा तडाखा देत जिल्हा रँकिंग टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

प्रशांत नगर येथील ललित कला भवनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या ज्युनिअर मुलांच्या गटातील चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रत्युष टवानीने अचानक आपल्या खेळात कमालीची चपळाई दाखवून मातब्बर शोन ठाकरे याला 11-7, 11-8, 9-11, 11-6 ने नमवले अन् अजिंक्यपदावर ताबा मिळवला.

पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीत अर्जुन खडसेने दमदार आक्रमक खेळाच्या बळावर शोन ठाकरेचा 11-9, 11-8, 8-11, 11-7 ने फज्जा उडवला. पुुरुषांच्या खुल्या गटात अर्जुन खडसे आणि भीष्म गगलानी यांच्यात उपांत्य सामना होणार आहे. एच.ए.खान हे या स्पर्धेचे मुख्य पंच असून, मिलिंद ठाकरे, संदेश सस्तकर, राहिल खान आणि शहझाद खान हे तांत्रिक बाजू आणि सहायक पंच म्हणून भूमिका वठवत आहेत. खेळाडू आणि क्रीडाप्रेमी या वेळी उपस्थित होते.
अनुष्काचा अजिंक्यपदावर ताबा
मुलींच्या युवा गटातील अटीतटीच्या निर्णायक सामन्यात उंचीने कमी असली, तरी अनुष्का साव हिने तिच्यापेक्षा उंच असणार्‍या ऐश्वर्या लोंदे हिचा चतुर खेळाच्या आधारे 11-8, 11-9, 8-11, 7-11, 14-12 ने पाडाव करून अजिंक्यपदावर ताबा मिळवला. मुलींच्या सब-ज्युनिअर गटाचे जेतेपद इरा पडोळे हिने पटकावले. प्रतिस्पर्धी खेळाडू अनुपस्थित राहिल्यामुळे इराला जेतेपद बहाल करण्यात आले.
अर्जुन दुहेरी मुकुटाचा दावेदार
या स्पर्धेत पुरुष गटात विजेतेपदाच्या निकट असलेल्या अर्जुन खडसे याने युवा मुलांच्या गटात विजेतेपद पटकावले. त्याचप्रमाणे उपांत्यपूर्व फेरीपर्यंत त्यांनी सारख्याच क्षमतेच्या खेळाडूंवर विजय मिळवत सर्वांना चकीत केले. चेंडूवर नियंत्रण, अचूक रिटर्न, आक्रमक फोरहँडच्या मदतीने अर्जुनने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करून यश संपादन केले. त्यामुळे तो दुहेरी मुकुटाचा दावेदार आहे.