आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Officers May Be Behind Paperleak Of Solider Recruitment ? CBI Suspect

सैन्य भरती पेपरफुटीमागे लष्करी अधिकार्‍यांचा हात?, सीबीआयला संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडण्यात भारतीय लष्करातील बडे अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा हात असू शकतो, अशी शक्यता सीबीआयच्या अधिकार्‍यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.
सैन्य भरतीसाठी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीत पात्र ठरणार्‍या उमेदवारांची रविवारी देशभर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी मराठवाडा आणि विदर्भातील उमेदवारांसाठी नागपुरातील विज्ञान संस्था येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. नागपूरच्या केंद्रावरून 1 हजार 400 विद्यार्थी परीक्षेला बसले. या लेखी परीक्षेचे पेपर फुटल्याची माहिती नागपूर सीबीआय कार्यालयाला मिळाली. सीबीआयच्या पथकाने रविवारी नागपुरातील विज्ञान संस्थेतील परीक्षा केंद्रावर छापा टाकला. त्या वेळी अनेक परीक्षार्थींकडे मोबाइल आढळले. एसएमएसच्या माध्यमाने प्रo्नांची उत्तरे उमेदवारांना बाहेरून पाठवण्यात आली होती. एसएमएसवर पाठवण्यात आलेली उत्तरे प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत होती.
टँगो चार्लीचा हात
नागपुरातील ‘टॅंगो चार्ली’ या खासगी सैन्य भरती प्रशिक्षण संस्थेतून उमेदवारांना ही उत्तरे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सीबीआयने टँगो चार्ली या संस्थेचा मालक जयकुमार बेलखोडे यास ताब्यात घेतले आहे. लष्करात नियुक्त झाल्यानंतर एका उमेदवाराकडून टँगो चार्लीला दीड लाख रुपये मिळणार होते. या प्रकरणी बेलखोडे याची कसून चौकशी सुरू आहे. तो सीबीआय अधिकार्‍यांना तपासात मदत करत आहे. आतापर्यंत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पेपरफुटीच्या प्रकरणात लष्कर भरती कार्यालयातील अनेक बडे अधिकारी गुंतले असल्याची शक्यता सीबीआयचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.