आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Special Aid To Vidarbh By Ramakant Dani

विश्लेषण: विदर्भाच्या बाजूने आक्रमक फलंदाजी, मुख्यमंत्री सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईसाठी महाराष्ट्रात सामील झालेल्या विदर्भावर यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी सातत्याने अन्यायच केला. विदर्भाला न्याय देणारे समन्यायी निधीवाटपाचे राज्यपालांचे निर्देशही वारंवार तुडवले गेले. या अन्यायामुळेच विदर्भात वेगळेपणाची भावना निर्माण झाल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत विदर्भाच्या बाजूने जोरदार फलंदाजी केली. आपले सरकार विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील मागास राहिलेल्या प्रदेशांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
माजी मंत्री भास्कर जाधव यांनी कोकणात शेतक-यांच्या आत्महत्या होत नाहीत याकडे लक्ष वेधताना विदर्भातील शेतक-यांसंदर्भात काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. ते शब्द त्यांना नंतर मागेही घ्यावे लागले. मात्र त्यामुळे विदर्भातील सदस्य संतप्त झाले हाेते. त्यामुळे या चर्चेला विदर्भ विरुद्ध कोकण अशा खडाजंगीचे स्वरूपही आले. त्यामुळे जाधव यांनी केलेल्या प्रबोधनाचा धागा पकडूनच मुख्यमंत्र्यांनी विदर्भावरील अन्यायाचा पाढा वाचला. त्याला सत्तापक्षाच्या सदस्यांकडून दाद मिळत होती.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबईसह महाराष्ट्राचे मराठी राज्य करण्याच्या भावनिक आवाहनातून विदर्भ सामील झाला. नागपूर करारातून विदर्भाच्या विकासाची आश्वासने दिली गेली. ती पाळली गेली नाहीत. विदर्भाचा शेतकरी अतिशय सधन होता. इंग्रजांवरदेखील शेतक-यांचे त्या काळात कर्ज होते. मात्र, काळानुरूप सिंचनाच्या, विजेच्या सुविधांचा विकास न झाल्याने विदर्भात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यातूनच विदर्भात वेगळेपणाची भावना निर्माण झाली आहे. घटनेने राज्यपालांना समन्यायी निधीवाटपाचे अधिकार दिले असताना पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी त्याचे निर्देशही पायदळी तुडविले’, असे फडणवीस यांनी सप्रमाण सांगितले. विदर्भाचा सिंचनाचा भौतिक अनुशेष ११ लाख हेक्टरच्या वर गेला असतानाच अमरावती विभागातील अनुशेष निर्मूलनाची स्थिती अत्यंत बिकट असून १९९४ चा अनुशेषदेखील दूर झालेला नाही, याकडे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मराठवाड्यावरही अन्याय
पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्यावरदेखील मोठा अन्याय केल्याने हा प्रदेश विकासात मागे पडला. पश्चिम महाराष्ट्राचा विकास साधला जात असताना तेथील अनेक तालुके तहानलेले ठेवून त्यांच्यावरही सातत्याने अन्याय झाला, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.