आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिमुकल्यांचा किलबिलाट अन् पालकांची घालमेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सकाळचे प्रसन्न वातावरण... आई-वडिलांसोबत निघालेली मुलं.. तोरणं, फुलांनी सजवलेले शाळांचे वर्ग. रांगोळ्यांची आरास.. औक्षण करणारे शिक्षकवृंद, गुलाबपुष्प आणि चॉकलेट्सचे वाटप.. नवीन गणवेश.. शाळांमध्ये पहिल्या दिवशी भारावलेले वातारण होते. आनंद, उत्साह, कुतूहल आणि पालकांच्या जिवाची घालमेल... अशा वातावरणात शाळेची घंटा वाजली अन् ‘बॅक टू स्कूल’ साजरे झाले...
अमरावती - शहरातील जिल्हा परिषद, महापालिका, खासगी आणि सीबीएसई शाळांमध्ये पुष्पगुच्छ आणि मिठाई, चॉकलेट्सने विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत झाले. गुरुजनांच्या शुभेच्छा, नवा-कोरा गणवेश आणि नवीन पुस्तकं देण्यात आली. मनपा आणि जिल्हा परिषद शाळा वगळता इतर सर्वच शाळांमध्ये पहिल्याच दिवशी जवळ-जवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या गर्दीने प्रत्येक शाळेचे आवार फुलले होते. आवाराबाहेर वाहने, सायकली, आॅटो, व्हॅन आणि रिक्षांची एकच गर्दी झाली होती. सरस्वती वंदना अन् राष्ट्रगीत आटोपल्यानंतर आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या शिरस्त्याप्रमाणे पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुलांना कुठे खिचडी, तर कुठे केशरभात वाढण्यात आला.

शाळेची वाट अन् उत्साहाचा थाट
शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थी आपल्या पालकांसह मोठ्या उत्साहात शाळेत दाखल झाले होते. नवे-कोरे कपडे, कार्टुनचे दफ्तर, नवीन वॉटरबॉटल अशा साहित्यांसह विद्यार्थी मोठ्या उत्साहात शाळेत उपस्थित झाले होते. दोन महिने सुटीचा मनसोक्त आनंद लुटल्यानंतर गुरुवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ बघायला मिळाली... पाठ्यपुस्तकांचे झाले वाटप : काही शाळांमध्ये प्रार्थनानंतरच मुलांना पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले, तर काही शाळांमध्ये वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. कायम अनुदानीत शाळांना पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात येते. त्यानुसार बहुतांश शाळांमध्ये पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले. तर काही ठिकाणी येत्या दोन तीन दिवसांत विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येईल, असे शाळांकडून सांगण्यात आले. इतर खासगी शाळांमध्ये गणवेशासाठी कुठलीही तरतूद नसल्याने त्यांनी त्यांच्या स्तरावरच गणवेशाचे वाटप केले. त्यामुळे खासगी शाळांमध्ये नवेकोरे कपडे घालून विद्यार्थी शाळेत दाखल झाले होते, तर जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळांमध्ये वेळेवर गणवेशाचे वाटप करण्यात आले.

मुख्याध्यापकांचा कानमंत्र :
उत्तम विद्यार्थी तोच असतो, जो शाळेतील प्रत्येकच तासाला उपस्थित असतो. त्याच्यात शिकण्याची जिज्ञासा, कला आत्मसात करण्याची वृत्ती आणि गुरुजनांचा प्रत्येक शब्द कानात साठवण्याची उत्कंठा असते, असे विचार बहुतेक मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.

गेले दोन महिने कंटाळवाणे वाटायचे; आता मात्र विद्यार्थ्यांच्या आगमनामुळे शाळेला जिवंतपणा आल्याची प्रतिक्रिया समर्थ हायस्कूलच्या मुख्याध्यापक माधवी मंगरुळकर यांनी व्यक्त केली.

मुले आली, फुले आली
खापर्डे बगीचा आदर्श प्राथमिक शाळेत नवेकोरे गणवेश घालून विद्यार्थी आपल्या पालकांसह शाळेत दाखल झाले. दुपारी पावणेबाराला शाळेची घंटा वाजली अन् मुलांनी आई-वडिलांची रजा घेत शाळेच्या आवारात एका रांगेत सरस्वती वंदन आणि राष्ट्रगीतासाठी धूम ठोकली. राष्ट्रगीतानंतर विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगताना मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना कानमंत्र दिला. त्याचप्रमाणे वर्गखोल्यांबद्दलही माहिती दिली.

महापालिकेच्या शाळांमध्ये अत्यल्प प्रतिसाद
रुक्मिणीनगरातील 19 नंबरच्या शाळेची इमरात म्हणायला दोनमजली. वर्ग खोल्या 20 आणि विद्यार्थी सात, अशी स्थिती होती. हीच स्थिती शहरातील इतर महापालिकेच्या शाळांची होती. शाळेचा पहिला दिवस असल्याने खुद्द शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शाळेत बोलावले, अशी माहिती शिक्षकांनी दिली. विद्यार्थ्यांच्या अत्यल्प प्रतिसादातही शाळा प्रशासनाने मात्र विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले. गुलाबाचे फूल देऊन त्यांना पेढा भरवण्यात आला. त्याचप्रमाणे पालकांकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
फोटो - शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. पालकांनी पाल्यांना शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सोडल्यानंतर होलिक्रॉस शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. यानंतर मुलांना शाळेतील नियम समजावून सांगण्यात आले. छाया : मनीष जगताप