आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zilha Parishad School Giving Bank And Atm Facility In Gondia District

दिव्य मराठी विशेष : इर्रिटोलाच्या झेडपी शाळेत विद्यार्थ्यांची बँक अन् एटीएम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हटल्या की साऱ्याच गोष्टींचा अभाव असतो. सारे काही रडत-रखडत सुरू असते; पण गोंदिया जिल्ह्यातील इर्रिटोला येथील जिल्हा परिषद शाळेत सारे काही अफलातून आहे.
काॅन्व्हेंटलाही मागे टाकणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांची अफलातून बचत बँक असून एटीएमही आहे. शालेय पोषण आहारात लागणारा भाजीपाला शाळेच्या परसबागेत पिकतो.

गोंदियापासून सुमारे दहा-पंधरा किमीवर असलेल्या इर्रिटोला येथे जिल्हा परिषदेची नवीन प्राथमिक शाळा आहे. संदीप सोमवंशी हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. शाळेत त्यांच्याशिवाय प्रतिभा डोंगरे या शिक्षिका, एक मदतनीस, एक स्वयंपाकी एवढा स्टाफ आहे. शाळेत एकूण ४० मुले. मुले घरून आणलेले खाऊचे पैसे रोज खर्च करून टाकायचे. सर्व मुले गरीब घरची. सर्वांच्या घरी बेताचीच परिस्थिती. या मुलांना बचतीची सवय लावली पाहिजे, या विचारातून बँकेची कल्पना सुचली.
२०११ मध्ये मुले व त्यांच्या पालकांची बैठक घेऊन बचतीचे महत्त्व सांगितले व बँक सुरू केली. शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. पहिली ते तिसरीपर्यंतची मुले साधारण हजार ते दीड हजार आणि चौथीतील मुले दोन-अडीच हजार रुपये जमा करतात. या पैशांतून मुलांचा पुढील वर्षाचा शैक्षणिक खर्च भागतो. शिवाय कौटुंबिक अडीअडचणीतही मुले पैसे काढू शकतात. एकूणच या उपक्रमाने सर्वत्र शाळेचे कौतुक होत आहे.
मुलांचे खाते सुरूच

चौथीतून पाचवीत दुसरीकडे शिकायला गेलेली मुलेही शाळेतील खाते बंद करत नाहीत. बचतीचे महत्त्व त्यांनाही कळले आहे. मात्र, पाचवीत गेलेली सर्वच मुले खाते सुरू ठेवत नाहीत. बहुतांश मुले बाहेरगावी शिकायला जातात. सध्या शाळेत एकूण ६२-६३ खाती आहे. आजघडीला शाळेत ८० हजार रुपये जमा आहेत.
स्मार्ट बॉय आणि गर्ल
- शाळेतील मुलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, त्यांनी नीटनेटके राहावे यासाठी स्मार्ट बॉय व स्मार्ट गर्ल उपक्रम सुरू केला. स्वच्छ गणवेश, केस नीट विंचरलेले, बूट पाॅलिश केलेल्या अशा एक विद्यार्थी व विद्यार्थिनीला बॅच देण्यात येतो. हा बॅच दिवसभर लावण्याची मुभा आहे. आपल्यालाही बॅच मिळावा यासाठी इतरही विद्यार्थी स्वच्छ राहतात.

- १०० टक्के उपस्थिती असलेल्या वर्गाला ध्वज देण्यात येतो. हा ध्वज वर्गासमोर डौलाने फडकतो. आपल्या वर्गातील सोबती अनुपस्थित राहू नये याची खबरदारी विद्यार्थी घेतात. वाढदिवशी विद्यार्थ्याला गुलाबाच्या फुलासह प्रमाणपत्र दिले जाते.
मॅन्युअल एटीएम
शाळेत मुलांसाठी एक मॅन्युअल एटीएम सुरू करण्यात आले आहे. तिसरी आणि चौथीतील मुलांना एटीएम सांभाळायची संधी दिली जाते. एटीएम मशीनची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्याला खऱ्याखुऱ्या एटीएमसारखा स्क्रीन तसेच लाल, हिरवा व पिवळा असे तीन दिवे लावण्यात आले आहेत. या मशीनच्या पलीकडे एक मुलगा बसलेला असतो. ‘किती पैसे काढायचे आहेत, खात्यात किती रक्कम शिल्लक आहे,’ अशी विचारणा करणारे कार्ड््स आहेत. अलीकडून मुलाने एटीएम कार्ड टाकले की पलीकडचा मुलगा आतून ‘किती पैसे काढायचे,’ असे कार्ड सरकवतो. त्यावर मुलाने रक्कम लिहून ते आत सरकवले की ‘तुमचा व्यवहार सुरू आहे,’ असा बोर्ड झळकतो व पिवळा दिवा लागतो.पैसे मिळाले की ‘आमच्या एटीएमचा उपयोग केल्याबद्दल धन्यवाद,’ असा बोर्ड झळकतो.
मुलांना शेती शिक्षण
मुलांना शेतीचे शिक्षण देण्यासाठी परिसरात परसबाग आहे. या परसबागेत वांगे, टोमॅटो, मेथी, पालक, लसूण घेतले जाते. शालेय पोषण आहारात परसबागेतील भाजीपालाच वापरण्यात येतो. याशिवाय पर्वतरांगांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे म्हणून शाळा परिसरातच पर्वतरांगा उभारण्यात आल्या आहेत.