आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर - सत्संग कार्यक्रमात पाण्याची उधळण करण्याचे समर्थन करताना आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी ‘पाणी कोणाच्या बापाचे नाही, मनात आले तर मी कधीही, कुठेही पाऊस पाडू शकतो,’ अशी वल्गना केली होती. त्याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खिल्ली उडविली आहे. ‘बापू, मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी भागात मंत्र-तंत्राच्या साह्याने खरेच पाऊस पाडून दाखवा,’ असे जाहीर आव्हानही संघटनेने दिले आहे.
राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईचे संकट भेडसावत असताना आसाराम बापूंच्या नाशिक, नागपूर व नवी मुंबईतील कार्यक्रमात हजारो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आल्याचा आक्षेप काही सामाजिक संघटना व प्रसारमाध्यमांनी घेतला होता. याच कारणावरून नवी मुंबईत बापूंच्या अनुयायांनी काही पत्रकारांवर हल्लाही केला होता. याप्रकरणी काही जणांना अटकही झाली होती.
बापूंनी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहत, सत्संगात होणारी ‘रंगपंचमी’ व्यर्थ नसून आरोग्यदायी असल्याचाच दावा केला होता. दरम्यान, वाद वाढल्याने व टंचाई तीव्र असल्याने गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी होळी होईपर्यंत बापूंच्या कार्यक्रमांना महाराष्टात बंदी घातली होती. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा राजस्थान, जम्मू व गुजरात या राज्यांत वळवला आहे.
नुकत्याच सुरतमध्ये झालेल्या सत्संग कार्यक्रमात बापूंनी महाराष्टात आपल्यावर झालेला पाणी उधळपट्टीचा आरोप खोडून काढत काही स्वयंसेवी संस्था व प्रसारमाध्यमांवर जाहीर टीका केली होती. तसेच पाणी ही देवाची देण असून आपण मनात आले तर कधीही, कुठेही पाऊस पाडू शकतो, अशी वल्गनाही केली होती.
‘राज्यात कुठेही चमत्कार करा
अन् 15 लाख रुपये मिळवा’
पाऊस पाडण्याबाबत बापूंचा दावा निराधार असल्याची टीका अंनिसचे कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. अंनिसने यापूर्वीच ‘चमत्कार करून दाखवा व 15 लाख मिळवा’ अशी ऑफर दिली होती, ती स्वीकारून बापूंनी दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भात पाऊस पाडून दाखवावाच, असे आव्हान त्यांनी दिले. या पत्राची प्रत जगद्गुरू शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांनाही पाठवण्यात आली आहे.
काय म्हणाले होते बापू?
‘आम्ही कुठल्या सरकारच्या बापाचे पाणी वापरत नाही. देवाचे पाणी वापरतो. देव माझा यार आहे, त्यामुळे मी त्याचे पाणी वापरून मनमुराद होळी खेळणारच. मीडियावाले भुंकत राहिले तरी त्यांना मी तुकडा टाकणार नाही. मनात आले तर मी चमत्कार करू शकतो. दुष्काळी भागातही पाऊस पाडू शकतो...!’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.